Tuesday, March 25, 2025
Homeराजकीयफक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे'; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्लावर...

फक्त ‘जशास तसे’ नाही तर, ‘जशास दुप्पट तसे’; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्लावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई । Mumbai

उद्धव ठाकरे यांच्यावर ताफ्यावर ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बांगड्या आणि शेण फेकले. ताफ्यातील काही गाड्यांचे नुकसान झाले. ठाणे शहरामध्ये १० ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकारावर आता राज ठाकरे यांनी मौन सोडलं आहे. राज ठाकरे यांनी या घटनेवर भाष्य करतानाच भविष्यात माझ्या आणि मनसैनिकांच्या नादाला लागू नका, असा इशाराही दिला आहे. तसेच त्यांनी आपल्या मनसैनिकांना अतिशय मोलाचं आवाहन केलं आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंची पोस्ट

सस्नेह जय महाराष्ट्र,

काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती.

माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता.

ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते. आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या.

बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने यापुढे देखील रहावं.

मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली.

मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हणलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विध्न निर्माण करण आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्याना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.

माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही याची त्यांना पण जाणीव आहे.

आणि लोकं हे पण म्हणतील तुम्ही मुद्द्याचं बोलताय, तुम्ही गुद्दे पण देताच की… हो आम्ही देतो गुद्दे….

महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांसाठी, माता, भगिनींसाठी आम्ही याआधी गुद्दे दिलेत आणि यापुढे देऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येऊन लोकांचे प्रश्न सोडवायचेत आणि त्यासाठी वेळेस दोन ठोसे हाणायची वेळ आली तर ते पण करूया. कारण ती शक्ती लोकांसांठी वापरली जाणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नका.

फक्त ‘जशास तसे’ नाही तर, ‘जशास दुप्पट तसे’ उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे.

महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत, ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीयेत ना याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल, इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. आणि तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू.

यांत काही मोजके पत्रकार, त्यांच्या हातातील वर्तमानपत्र असो की एखादं चॅनेल, याचा उपयोग लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरायचं सोडून, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा हत्यार म्हणून वापर करत आहेत हे उघड झालं.

समाजात कसा द्वेष पसरवता येईल, एखाद्याचं प्रतिमाहनन कसं होईल हे पाहत आहेत. तुम्ही ते आर्थिक लाभासाठी करताय की अजून कशासाठी करताय, याच्याशी मला देणंघेणं नाही. मूठभर राजकीय नेते आणि मूठभर पत्रकार यांचे आर्थिक हितसंबंध त्यांना लखलाभ. पण जे तुम्ही करताय ते दुधारी शस्त्र आहे आणि त्यातून जो वणवा पेटतोय त्यात तुम्हीच खाक व्हाल हे विसरू नका.

जाता जाता इतकंच सांगतो की, या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे, काल पण बोललो आहे, तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा.

आपला

राज ठाकरे

हे ही वाचा : अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन येणारच; ठाकरेंवरील हल्ल्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया

दरम्यान, राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. कुठं जावं, काय निर्णय ध्यावा, अशा द्विधा मनस्थितीत ते सापडले आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाला फायदा पोहोचवण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेमध्ये लढाई सुरु करण्याचं षडयंत्र भाजपानं रचलं आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा : “तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही”; बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

शनिवारी ठाण्यात जो काही वाद झाला ते मर्यादेचं उल्लंघन होतं. मुळात राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. कुठं जावं, काय निर्णय घ्यावा, अशा द्विधा मनस्थितीत ते सापडले आहेत. अशा परिस्थितीत शिंदेंना फायदा पोहोचवण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेमध्ये लढाई सुरु करण्याचं षडयंत्र भाजपानं रचलं आहे. मतांचं विभाजन करण्याच्या हेतूने हा सगळा खेळ सुरू आहे, अशी टीका विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...