Saturday, January 17, 2026
HomeराजकीयRaj Thackeray : मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Raj Thackeray : मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई । Mumbai

देशातील सर्वात श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेवर अखेर सत्तांतर घडून आले आहे. तब्बल 25 वर्षे ठाकरे कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबई महापालिकेत 2026 च्या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. 89 जागांवर विजय मिळवत भाजप हा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, त्यामुळे आगामी काळात महापौरपद महायुतीकडे जाणे निश्चित झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

- Advertisement -

यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी आणि लक्षवेधी ठरली. सुमारे 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येत निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या युतीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 165 जागांवर निवडणूक लढवली होती, तर मनसेने 53 जागांवर उमेदवार दिले होते. निकालानुसार शिवसेनेला 65 जागा, तर मनसेला केवळ 6 जागांवर विजय मिळाला. एकत्रितपणे ठाकरे बंधूंना 71 जागा मिळाल्या असल्या तरी सत्तेसाठी हा आकडा अपुरा ठरला.

YouTube video player

या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी पराभव स्वीकारत कार्यकर्त्यांचे आभार मानले असून, पुढील राजकीय वाटचालीबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

सस्नेह जय महाराष्ट्र,

सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.

बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.

लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !

आपला नम्र
राज ठाकरे

मुंबईतील मनसेच्या सहा उमेदवारांनी विविध प्रभागांमधून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 38 मधून सुरेखा परब, प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या, प्रभाग क्रमांक 128 मधून सई शिर्के, प्रभाग क्रमांक 205 मधून सुप्रिया दळवी, प्रभाग क्रमांक 115 मधून ज्योती राजभोज आणि प्रभाग क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदार यांनी मनसेसाठी यश संपादन केले आहे. मुंबई महापालिकेच्या या निकालामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक आणि विधानसभेच्या निवडणुकांवरही या निकालाचा प्रभाव पडण्याची चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

Ajit Pawar : निवडणूक हरताच अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला...

0
पुणे । Pune महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसल्यानंतर, राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये उपमुख्यमंत्री...