Tuesday, January 13, 2026
Homeराजकीयअदानी घरी आले म्हणून त्यांची पापं झाकायची का?; 'त्या' फोटोवरून राज ठाकरेंचं...

अदानी घरी आले म्हणून त्यांची पापं झाकायची का?; ‘त्या’ फोटोवरून राज ठाकरेंचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर

मुंबई । Mumbai

मुंबईतील सभेत उद्योगपती गौतम अदानी आणि केंद्र सरकारवर तोफ डागल्यानंतर, भाजपने राज ठाकरे आणि अदानींच्या भेटीचा फोटो व्हायरल करून प्रत्युत्तर दिले होते. या टीकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. “माझ्या घरी गौतम अदानी आले, म्हणजे त्यांची पापं मी झाकायची का?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी गेल्या १० वर्षांत अदानींच्या साम्राज्याचा विस्तार कसा झाला, हे आकडेवारीसह मांडले होते. त्यावर भाजपने राज ठाकरे आणि अदानी यांच्या जुन्या भेटीचा फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत निशाणा साधला. यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या घरी फक्त गौतम अदानीच नाही, तर रतन टाटा, मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांसारखे दिग्गज उद्योगपती आणि अनेक चित्रपट कलाकारही येऊन गेले आहेत. घरी आलेल्या पाहुण्याला मी हाकलून देऊ का?”

YouTube video player

यावेळी त्यांनी दोस्ती आणि महाराष्ट्र हित यातील फरक स्पष्ट केला. “जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितावर संकट येईल, तेव्हा राज ठाकरे मैत्री किंवा इतर संबंध पाहणार नाही. अडाणींशी मैत्री करण्याचा प्रश्नच येत नाही, मी इतका अडाणी नाही. पण मी जे मुद्दे मांडले आहेत, त्याचे गांभीर्य समजून घ्या,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

गौतम अदानींच्या उद्योगांवर सडकून टीका करताना राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यवसायातील वाढीवर संशय व्यक्त केला. अदानी हे आधी सिमेंट व्यवसायात नव्हते, पण आज ते दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सिमेंट उत्पादक बनले आहेत. देशातील विमानतळांबाबत बोलताना ते म्हणाले की, “नवी मुंबईचे विमानतळ सोडले तर अदानींनी या देशात स्वतः एकही विमानतळ बांधलेले नाही. दुसऱ्यांनी बांधलेली आणि चालवत असलेली विमानतळं केवळ सत्तेचा धाक दाखवून स्वतःकडे घेतली गेली आहेत.”

बंदरांच्या बाबतीतही तेच झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. गुजरातमधील मुंद्रा पोर्ट वगळता देशातील इतर बंदरे ही दुसऱ्यांच्या मालकीची होती, ती दबावाखाली अदानींनी मिळवल्याचा आरोप ठाकरेंनी केला. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करूनच हा माणूस देशभर पसरला असल्याचे ते म्हणाले.

शेवटी, अदानींच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड वाढीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “२०१४ ते २०२५ या अवघ्या ११ वर्षांत जगात इतका श्रीमंत झालेला दुसरा कोणीही नाही. टाटा आणि बिर्ला यांसारख्या मोठ्या उद्योजकांना आपले साम्राज्य उभे करण्यासाठी ५० ते ६० वर्षे लागली. मात्र, एका माणसाचे १० वर्षांत एवढे मोठे होणे हे संशयास्पद आहे,” असे म्हणत त्यांनी अदानी आणि भाजपच्या साट्यालोट्यावर पुन्हा एकदा कडाडून टीका केली.

ताज्या बातम्या

ZP Election Maharashtra : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आज...

0
मुंबई | Mumbai राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत (Zilla Parishad and Panchayat Samiti Election) सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका पूर्ण...