मुंबई | Mumbai
महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न मांडणारा हा चित्रपट असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यांनी या चित्रपटाचे कौतूक केले आहे.
राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
मी दोन दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला… समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही… पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाला पर्याय नाही…
विकास कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली
आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे ‘विकास’ अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.
https://www.facebook.com/share/p/1BMKfK32ru
शेतकरी पार हतबल झाला आहे
या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे”.
जोपर्यंत याविरोधात चीड निर्माण होणार नाही, तोपर्यंत…
राज ठाकरे पुढे म्हणाले,”हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही… पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट जरूर पहा”.
अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या चित्रपटाने 53 कोटींची कमाई केली आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





