मुंबई | Mumbai
मुंबई महागनर पालिकेच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दादर येथील शिवतीर्थवर संयुक्त सभा होत आहे. या सभेला दोन्ही ठाकरे बंधूंसोबत युतीत समावेश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या सभेत राज ठाकरे यांनी मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कशाप्रकारे पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु आहेत, अशी मांडणी केली.
यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाला महाराष्ट्रात कशाप्रकारे प्रकल्प देण्यात आले आहेत, याचे प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडीओत एक नकाशा दाखवण्यात आला. यामधून २०१४ ते २०२५ या काळात अदानी समूहाला सरकारकडून कशाप्रकारे मुंबईसह देशभरात अनेक प्रकल्प आणि जमिनी देण्यात आल्या, मोदी सरकारने गेल्या वर्षात कशाप्रकारे कृपादृष्टी दाखवत त्यांना प्रकल्प दिले, याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा! स्वतःला जाहीर केला ‘या’ देशाचा कार्यवाह राष्ट्राध्यक्ष
भाजपवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की, महानगरपालिकेत भाजपने अकोटमध्ये एमआयएमबरोबर युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेसबरोबर युती केली, तर 66 जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच भाजपने काढून टाकला. आज 66 बिनविरोध नगरसेवक निवडून आले, पण हे आकडे पुढे आणखी वाढत जातील. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं की, लोक विकले जातात. तुळजापूरमध्ये ड्रग्ज रॅकेटमधील एका व्यक्तीला उमेदवारी दिली. बदलापूरमधील बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या एका व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक केलं. ही हिम्मत कुठून आली? हा उद्दामपणा, ही मस्ती कुठून आली?, असे प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात गौतम अदानींवर केलेल्या मेहेरबानी नजर टाकली आहे.
राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडीओ वेळी शिवतीर्थावर पसरली शांतता
राज ठाकरे म्हणाले की, 2024 च्या निवडणुका झाल्यानंतर मला जी माहिती समजली, त्यानंतर मला धक्का बसला. या लोकांनी हिंदी आणि इंग्रजी चॅनल्स असे सगळे ब्लॉक करून टाकले आहे. कोणी काही तुम्हाला दाखवणार पण नाही. पण मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या भारताचा एक नकाशा दाखवतो. २०१४ साली गौतम अदाणी यांचे प्रोजेक्ट किती होते? याची ही आकडेवारी. म्हणजे मोदी पंतप्रधान होण्याआधी गौतम अदाणी कुठे होते आणि त्यानंतर आज गौतम अदाणी कुठे आहेत?, असं म्हणत राज ठाकरे यांनी गौतम अदाणी यांच्यां प्रकल्पांची यादीच दाखवली.
राज ठाकरे हे अदानी समूहाच्या २०१४ ते २०२५ या काळात वाढत गेलेल्या साम्राज्याचा नकाशा दाखवत होते. या व्हिडीओला धीरगंभीर असा बॅकग्राऊंड म्युझीक होता. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड परिणामकारक ठरला. यानंतर राज ठाकरे यांनी एक-एक करुन मुंबई आणि महाराष्ट्रात अदानी समूहाला कशाप्रकारे जमिनी आणि प्रकल्प देण्यात आले, याची यादी वाचून दाखवली. यावेळी शिवतीर्थ मैदानावर एकच शांतता पसरली होती.




