मुंबई । Mumbai
राजकारणातील सध्याच्या घडामोडींमध्ये ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं पुन्हा एकत्र येणं ही चर्चा केंद्रस्थानी असताना, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावर थेट आणि स्पष्ट भाष्य करत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. “एकाच मराठी आईची दोन मुले जर भांडत राहिली, तर मराठी माणसाचं काय होईल?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मराठी अस्मितेवर घाव बसत असल्याचं सूचित केलं.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रकाश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, “मराठी माणूस आपल्याकडे प्रचंड आशेने पाहतोय. जर आपण असेच भांडत राहिलो, एकमेकांवर आरोप करत राहिलो, तर मराठी माणूस आपल्याला माफ करणार नाही.” त्यांनी हे देखील नमूद केलं की, ‘कोणी आधी भेटावं, कोणी नंतर… हा सगळा तमाशा जनतेसमोर सुरु आहे आणि हे चित्र निराशाजनक आहे.’
महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “संजय राऊत यांनी वरिष्ठ नेत्यासारखं वागायला हवं. आमच्याकडून बाळा नांदगावकर दोन वेळा मातोश्रीवर गेले. आम्ही हे समजतो की, त्यांनी जाणं म्हणजे राज ठाकरे यांनीच गेले, असंच आहे. पण तुमच्याकडून राज ठाकरेंकडे कोणी गेलं का? तुम्ही एकत्र येण्यासाठी कधी पुढाकार घेतला का?” असा थेट सवाल महाजन यांनी उपस्थित केला.
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरूनही प्रकाश महाजन यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. “ज्याचं फोटो दाऊदच्या माणसासोबत आहे, अशा व्यक्तीला भाजपात घेतलं जातं. नाच करणाऱ्या माणसांना सत्तेच्या नजरेतून पक्षात घेतलं जातं. मग सामान्य जनतेनं कोणावर विश्वास ठेवायचा?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
महाजन यांचं भाष्य केवळ राजकीय समीकरणांपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यांनी भावनिक मुद्दाही उपस्थित केला. “इतिहासाने आपल्यावर जबाबदारी टाकली आहे. ती जबाबदारी आपण पार पाडली नाही, तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. जर आज आपण मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुढं आलो नाही, तर तो 100 वर्षे मागे जाईल,” अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली. महाजन यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ठाकरे बंधूंनी आता राजकीय भांडण बाजूला ठेवून एकत्र यायला हवं. “जर हे दोघं भाऊ एकत्र आले नाहीत, तर मराठी माणूस पूर्णपणे निराश होईल. त्यामुळे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येणं गरजेचं आहे,” असं ठाम मत त्यांनी मांडलं.




