Friday, May 3, 2024
Homeनगरअडचणीतील सहकारी दूध संघांना संरक्षण द्यावे - परजणे

अडचणीतील सहकारी दूध संघांना संरक्षण द्यावे – परजणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

अडचणीच्या काळात नफातोट्याचा विचार न करता शासनापेक्षा अधिकचा दर देऊन दूध उत्पादकांना आधार देणार्‍या सहकारी दूध संघांच्या पाठिशी उभे राहून संरक्षण देण्याचे धोरण शासनाने स्वीकारावे, अशी मागणी गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या या ठरावास सर्व सभासद व दूध उत्पादकांनी सहमती दर्शवली.

- Advertisement -

गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी अध्यक्षपदावरुन राजेश परजणे यांनी संघाच्या कामकाजाविषयी व भविष्यात राबविण्यात येणार्‍या विविध योजनांविषयीची माहिती दिली. कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय सविस्तर चर्चेने सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

श्री. परजणे म्हणाले, गोदावरी दूध संघाने अहवाल सालामध्ये एकूण 5 कोटी 91 लाख 26 हजार 118 लिटर्स दुधाचे संकलन केलेले असून वार्षिक उलाढाल 229 कोटी 68 लाख 97 हजार इतकी झालेली आहे. शेतकर्‍यांना दूध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी संघाने अमेरिकेतून आयात केलेल्या अत्याधुनिक सॉर्टेड सिमेनची ऑक्टोबर 2016 पासून कार्यक्षेत्रात सुरुवात केली. या सॉर्टेड सिमेनमुळे जन्माला येणार्‍या कालवडींची संख्या 92 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. जन्मलेल्या कालवडींपैकी अनेक कालवडी व्यायल्या असून त्यांची दूध देण्याची दैनंदिन क्षमता सुमारे 26 ते 27 लिटर्स इतकी आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांकडे असलेल्या गायींसाठी 1,050 रुपये किंमतीचे सॉर्टेड सिमेन सवलतीच्या दराने म्हणजेच 150 ते 200 रुपये प्रमाणे तीन महिन्यांकरिता उपलब्ध करुन दिलेले होते. त्यासोबत 24 लाख 05 हजार 600 रुपयाचे मिनरल मिक्चर मोफत देण्यात आलेले आहे. या उपक्रमाचा दूध उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

स्टेट बँक ऑफ इंडिया व प्रवरा सहकारी बँकेच्या आर्थिक सहकार्याने गाव पातळीवरील प्राथमिक सहकारी दूध संस्था व सेंटरच्या दूध उत्पादकांना गायी खरेदी, गोठा दुरुस्ती, कडबाकुट्टी, मिल्कींग मशिन असे साहित्य खरेदी करण्यासाठी कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच नव्याने स्टेट बँकेच्या कोपरगाव शाखेकडून संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना गायी खरेदीसाठी अत्यल्प व्याजाने कर्ज पुरवठा केला असल्याचे श्री. परजणे यांनी केले.

सभेला संघाचे संचालक राजेंद्रबापू जाधव, विवेक परजणे, उत्तमराव माने, निवृत्ती नवले, यशवंतराव गव्हाणे, भिकाजी थोरात, भाऊसाहेब कदम, सदाशिव कार्ले, दिलीप तिरमखे, सुनंदाताई होन, कुंदाताई डांगे यांच्यासह संघाचे सभासद, दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ज्येष्ठ कार्यकर्ते आंबादास वराडे यांनी आभार व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या