Wednesday, February 4, 2026
Homeनाशिकराज-का-रण : नीतीचे पद जेथे न ढळे, धर्म होतसे तेथेच स्थिर...

राज-का-रण : नीतीचे पद जेथे न ढळे, धर्म होतसे तेथेच स्थिर ||

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

पक्षांतराची सारी व्याख्याच बदलवून टाकणारे असे प्रसंग जनतेच्या मनातून जातील का, हा खरा प्रश्न आहे. लोकांनाही याचे काहीच वाटणार नसेल तर मग रस्ते, गटारींची दुर्दशा, गोदावरीची गटारगंगा, तपोवनातील वृक्षतोड, भालेकर हायस्कुलच्या मरणकळा अशा समस्यांबाबत तक्रार करण्याचाही त्यांना अधिकार नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागते. सावध ऐक पुढल्या हाका.

- Advertisement -

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

YouTube video player

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!
– केशवसुत

आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ज्यांना मराठी सारस्वतात मानाचे स्थाने आहे, अशा कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांच्या गेल्या शतकात लिहिलेल्या तुतारी या कवितेची आज प्रकर्षाने आठवण झाली, ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात काही नेत्यांच्या प्रवेशावेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे. केशवसुत हे खरेतर गेल्या पिढीचे कवी. परंतु त्यांनी त्या काळात लिहिलेली ही कविता कशी कालातीत आहे, याचे प्रत्ययकारी दर्शन सध्याच्या राजकीय वातावरणात पडलेले दिसते. कवितेच्या प्रत्येक कडव्यातील शाब्दिक प्रहार हे जणू आजच्या राजकारण्यांसाठीच असावेत असा भास होतो. हल्ली राजकारणात कोण कुठे जातो याला तसे कोणाच्याच लेखी फार महत्व राहिलेले नाही. गेली काही वर्षे तर दररोज केवळ आयाराम-गयारामांच्या बातम्यांनीच माध्यमांना विषय मिळत राहिले आहेत. त्यातील सगळीच नवलाई संपली आहे. असे असतांना काही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे एवढा गहजब कशासाठी, याचा आढावा घेतांनाच या संपूर्ण घटनेचा पंचनामा करण्याचीही गरज आहे. केवळ नाशिककरांनीच (Nashik) नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राने हा पक्षांतरावेळी झालेला राडा दूरचित्रवाणीच्या पडद्यावर याचि देहि याचि डोळा पाहिला.

समाजमाध्यमांवर या घटनेवरील आमजनतेच्या प्रतिक्रिया वाचल्या तर संबंधीतांची मानही शरमेने खाली जाईल. अर्थात, शरम असली तर. असे म्हणावेसे वाटते कारण, जनाची तर नव्हतीच पण मनाचीही ज्यांनी सोडली त्यांना या कृतीचा जाब विचारलाच गेला पाहिजे. त्या दिवशी शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) या पक्षांच्या काही दिग्गजांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. खरे तर असले प्रवेश साधारण रोजच चालू आहेत. आदल्याच दिवशी काँग्रेसचे राहूल दिवे, आशा तडवी व उबाठाचे सुनील बोराडे आदी माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला आपलेसे केले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी (शप) शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा फारसा कोणी उठाव केला नाही की आक्षेप घेतला. पण त्या संबंधीत नेत्यांच्याच प्रवेशावेळी राडा का झाला, याची कारणमिमांसा केल्याशिवाय हा फरक कळणार नाही. कारण एवढा तमाशा झाला तरी अनेक जण अजूनही लोक पक्षात येत आहेत तर त्यांना नाही कसे म्हणायचे, पक्षविस्तार करतांना अशा गोष्टी होणारच, नाराजांचा राग काही दिवसांनी मावळेल, अशी मल्लिनाथी करीत बसले आहेत. याचाच अर्थ या मंडळींना कशाचेच काही वाटेनासे झाले आहे. पक्षाला सत्ता मिळवायची म्हणून कमरेचेही सोडायला तयार असल्याचेच हे लक्षण. सभ्य समाजाला हे चालणार आहे का हा खरा प्रश्न आहे. सनातन धर्माच्या नावाने समस्त विश्वाला संस्काराचे धडे देऊ पाहणाऱ्यांना तरी हे कसे चालते असा प्रश्न पडतो, अर्थात तो देखील आपल्यासारख्या सामान्यांना. ज्यांना व त्यांच्या सहानुभूतीदारांना तो पडावा असे वाटते ते तर मूग गिळून बसले आहेत. ही, एका पक्षांतरामुळे आलेली उद्विग्नता नाही. सध्या राजकीय पक्ष (Political Party) ज्या पध्दतीने सामान्य माणसांना, व निवडणुकीच्यावेळी जो राजा बनवला जातो त्या मतदाराला गृहित धरुन जे निर्णय घेत सुटले आहेत, त्यातून आलेली ही हतबलतेची भावना आहे. काहीही केले तरी लोक निवडून देतातच ना, ही मग्रुरी अशा वर्तनामागे असते. ती भयंकर आहे.

पूर्वीही पक्षांतरे भरपूर झालेली आहेत. पण त्यावेळी लोक काय म्हणतील असा एक नैतिक धाक असे. मनाची नसली तरी जनाची लाज बाळगण्याचा संस्कार तेव्हा होता. आता सगळ्यांनीच सगळं काही सोडलं आहे. काँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादीचे नितीन भोसले, उबाठाचे यतीन वाघ यांनीही खरे तर भाजपची वाट धरली आहे. पण त्यांच्या प्रवेशाला झाला नाही एवढा टोकाचा विरोध, आक्षेप हा विनायक पांडे व दिनकर पाटील या दोघांच्या प्रवेशामुळे झाला. भाजपच्या महापालिका निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांना विश्वासात न घेतल्यामुळे त्यांनी या सर्वच प्रवेशांना तीव्र विरोध केला. त्यांच्या समर्थकांची तर मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारण्यापर्यंत मजल गेली. दस्तुरखुद्द फरांदे यांनी या प्रवेश सोहळ्यावर बहिष्कार टाकणे पसंत केले. यातील फरांदेंना विश्वासात न घेतल्याने त्यांचा झालेला उपमर्द हे एक कारण आहेच. शिवाय, आदल्याच दिवशी याच प्रभागातील राष्ट्रवादीचे इच्छुक बबलू शेलार यांना भाजपमध्ये घेतलेले असल्याने नंतरच्या सर्व माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे खैरेंना दिलेल्या शब्दाचे आता काय, असे फरांदेंना वाटले असणार. त्यांची येथे गोची झाली, हे उघडच. दिनकर पाटील वगळता उर्वरित सर्वच नेते हे नाशिक मध्य या फरांदेंच्या मतदार संघातील असून त्यांनी गेल्या तीन टर्ममध्ये फरांदेंना कमालीचा विरोध केलेला आहे. शाहू खैरेंनी तर एकदा त्यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक लढविली आहे. साहजिकच फरांदेंच्या आक्षेपाचे तेही एक कारण असू शकेल, हे समजू शकते. ज्या लोकांनी भाजपच्या उमेदवाराचे तनमनधनाने गेली काही वर्षे काम केले त्यांना संधी देण्याची वेळ आली तेव्हा या बाहेरच्या मंडळींना आवतण देणे फरांदेंच्या जिव्हारी लागले असणार.

साहजिकच त्यांनी अशा विविध कारणांमुळे या सगळ्यांनाच जाहीर विरोध केला. महाजनांशी त्यासंदर्भात पंगा घेण्याचे धारिष्ट्यही दाखविले. या प्रवेशनाट्यामुळे भारतीय जनता पक्षातील नेत्यांमधील बेदिली, अहंकाराचा दर्प अन् वर्चस्वसंघर्षाचा एक अंक दिसला. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असल्याचे दिसल्यानंतर सामान्य कार्यकर्तेही विरोधासाठी उठले हा झाला दुसरा अंक. हा सारा पक्षांतर्गत मामला असल्याने त्याच्याशी समाजालाही तसे काही देणेघेणे नाही. त्याबाबत कोणाचीच साधी तक्रारही नाही. अगदी प्रवेशाला बोलावले अन् तीन तास भर उन्हात रस्त्यावर ताटकळत ठेवले, मागील दाराने प्रवेश करविला म्हणून या मंडळींचीही काहीही तक्रार नव्हती. उलट केव्हा एकदा भाजपचा भगवा टिळा लावतो, एवढे अधीर हे सगळे झालेले असल्याने त्यांना कोणाच्या विरोधाची पर्वा करण्याचेही कारण नव्हते. असे असले तरी मनसेचे दिनकर पाटील व उबाठाचे विनायक पांडे यांचे प्रवेश कोणालाच रुचले तर नाहीच, पण सामान्य जनतेचाही प्रचंड संताप झाला. उध्दव व राज ठाकरे यांनी ऐक्याची घोषणा केली तेव्हा नाशिकमध्ये या दोघांच्या पक्षकार्यकर्त्यांनी एकत्रित जल्लोष केला. या जल्लोषात सर्वाधिक उत्साह होता तो दिनकर पाटील व विनायक पांडे यांचाच. दिनकर पाटील तर नाचून बेभान झालेले दिसले. त्यांनी एकमेकांना तसेच तेथे हजर असलेल्या इतरांना आनंदाने पेढेही भरविले. तत्पूर्वी हे दोघेही नेते आपापल्या पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखतीही घेत राहिले. आणि चोवीस तासही उलटत नाही तोच त्यांनी आपापल्या पक्षांना फाट्यावर मारत भाजपची वाट धरावी, हे कोणालाही रुचले नाही. निष्ठेचा असा बाजार मांडलेला कोणी पाहिलेला नाही. त्यामुळेच आदल्या दिवशीचा त्यांचा आनंद खरा की दुसऱ्या दिवशी त्याच आनंदावर विरजण टाकून केलेले पलायन खरे. दोघांचाही पक्षांतराचा मोठा प्रवास आहे. दिनकर पाटील हे तर काँग्रेस, जनता दल, बहुजन समाज पक्ष, भाजप, मनसे असा फार मोठा प्रवास करुन भाजपमध्ये गेलेले आहेत.

काँग्रेसमध्ये (Congress) त्यांनी शहराध्यक्षपदही भूषविले होते. बसपाकडून त्यांनी लोकसभा तर मनसेकडून विधानसभा लढविलली आहे. तत्व, मूल्य अशा कशाशीच दुरान्वयानेही घेणेदेणे नसलेल्या या पाटलांनी विकासासाठी भाजपमध्ये जात असल्याचे सांगणे हा तर मोठाच विनोद झाला. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला याच महाशयांनी भाजपच्या सीमाताई हिरे यांच्याविरोधात समस्त इच्छुकांची गोळाबेरीज करुन पक्षाच्या मुखंडांना जेरीस आणले होते. तेव्हा गिरीश महाजनांनीच त्यांना जागा दाखवून दिली होती. उमेदवारी हिरेंनाच मिळाल्यानंतर एका रात्रीतून दिनकर पाटील मनसेचे उमेदवार झाले. पराभूत झाल्यानंतर भाजपवर व त्यांच्या कार्यशैलीवर प्रचंड आऱोप केले. परवाही त्यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांनी मनसेच्या जाहीर सभेत भाजपवर तोंडसुख घेत असल्याच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झालाच. विधानसभेला भाजपला टाटा करतांना त्यांना विकासाची काही पडली नव्हती. आता मात्र विकासासाठी पक्ष बदलत असल्याचे त्यांचे कारण म्हणज दांभिकतेचा नमुना झाला. पांडेंनीही शिवसेना, राष्ट्रवादी व पुन्हा शिवसेना असा प्रवास केलेला आहे. पाटलांच्या तुलनेत पांडेंनी पक्षांतरे कमी केलेली असली तरी त्यांना महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख, महापौर या पदांबरोबरच घरात तीन नगरसेवकांची पदे मिळालेली आहेत. आता देखील त्यांच्या घरात उमेदवारी देण्याबाबत पक्षाचीही खळखळ नव्हती. परंतु तरीही त्यांनी भाजपची गाडी पकडली. तसेही गेल्या काही महिन्यांपासून त्यांची गाडी बिघडलेली होतीच. एका कार्यक्रमातून ते रागारागाने बाहेर पडले तेव्हाच खरे तर त्यांच्या पक्षांतराची नांदी झाली होती. प्रत्यक्ष कृती आता झाली एवढेच. पांडे काय किंवा पाटील काय, यांच्या पक्षांतराविषयी कोणाची तक्रार असण्याचे कारण नाही. फक्त त्यांनी आदल्यादिवशी जो जल्लोष करुन एक चेहरा दाखविला तो नसता दाखविला तर कदाचित आणखी एक पक्षांतर म्हणून या घटनेकडे पाहून सर्वांनीच दुर्लक्ष केले असते.

या प्रकाराने भाजपमधील अंतर्गत संघर्षाला चांगलेच धुमारे फुटल्याचे दिसते. संकटमोचक गिरीश महाजन यांनी या धुमाऱ्यांना हवा दिली तर आहेच, पण प्रचंड राडा झाल्यानंतरही ते ज्या रीतीने चालायचंच अशा थाटात वावरले हे पाहून हा निगरगठ्ठपणा, बनचुकेपणा की डावपेचाचा भाग समजायचा असा प्रश्न पडला. पक्षातील स्थानिक तीनही आमदारांमध्ये असलेला वाद मध्यंतरी मिटला तो महाजन या एकाच मुद्यावर. तिघेही आमदार महाजन यांची तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले. पण तिथे त्यांची काहीच मात्रा तर चालली नाहीच उलट चार अधिकचे शब्द ऐकून घ्यावे लागले ते वेगळेच. या घटनेनंतर पालिका निवडणुकीच्या प्रमुखपदी राहूल ढिकले यांची निवड झाली. खरे तर देवयानी फरांदे या सर्वार्थाने ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी द्यायला हवी होती. परंतु त्यामुळे नाराज झालेल्या फरांदे योग्य संधीची वाटच पहात होत्या. ढिकलेंच्या एका व्हिडीओमुळे त्यांना ही संधी मिळाली आणि ती त्यांनी साधली. लागलीच ढिकलेंची उचलबांगडी होऊन फरांदेंकडे निवडणुकीची जबाबदारी आली. महाजनांनी एकाच दगडात अनेक पक्षी तोपर्यंत मारले होते. आपल्याविरोधात तक्रारी करणारे यानिमित्ताने एकमेकाचे स्पर्धक बनले हे महाजनांच्या राजकीय हिशेबासाठी कळीचे होते. फरांदेंकडे जबाबदारी आल्यानंतर ढिकलेंनाही तो अपमान वाटला. त्यांनी ही नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. नंतर तोंडी त्यांच्याकडेही सहप्रभारी जबाबदारी दिली गेली. पण नंतर त्यांनी काट्याने काटा काढण्याचा प्रयोग केला. बबलू खैरे यांना गळाशी लावल्यावर प्रभाग तेरामध्ये फरांदे यांच्या समर्थकांची सोय झाली होती.

नेमक्या याचवेळी काँग्रेसमध्ये नाराज असलेले शाहू खैरे, शिवसेनेत कुंपणावर असलेले विनायक पांडे, यतीन वाघ व मनसे-राष्ट्रवादी अशा पक्षांमध्ये असलेले भोसले कुटुंबीय यांच्याशी जुळवून एका रात्रीत सगळे फासेच उलटविले. आता शाहू खैरे, पांडे, वाघ व भोसले असे पॅनल लागलीच त्यांनी परस्पर जाहीरही करुन टाकले आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच या चौघांचा असा प्रचारही सुरु झाल्याने भाजपमधील अस्वस्थता वाढली आहे. दिनकर पाटील यांचा कुटुंबियांसह प्रवेश झाला तेव्हा ज्यांच्यावर हेत्वारोप करुन पाटलांनी तेव्हा भाजपचा त्याग केला होता, त्या आमदार हिरेंनाच त्यांचे स्वागत करायला लावून पक्षनेते नेमका कोणता संदेश देऊ पहात आहेत, हे कळायला मार्ग नाही. या आमदारांनीही स्वाभिमान खुंटीला टांगून ठेवलेला असल्याने जळगावकरांची मुशाफिरी मनमुरादपणे चालली आहे. प्रवेश झाले. उद्या उमेदवारीही जाहीर होतील. नंतर निवडणुकाही होतील. पण पक्षांतराची सारी व्याख्याच बदलवून टाकणारे असे प्रसंग जनतेच्या मनातून जातील का, अशा खरा प्रश्न आहे. लोकांनाही याचे काहीच वाटणार नसेल तर मग रस्त्यातील खड्डे, गटारीची दुर्दशा, गोदावरीची झालेली गटारगंगा, तपोवनातील वृक्षतोड, भालेकर हायस्कुलच्या मरणकळा अशा समस्यांबाबत आवाज उठविण्याचा किंवा तक्रार करण्याचाही त्यांना अधिकार नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागते. ज्या जनेतच्या जीवावर या मंडळींचे राजकारण चालते, त्या राजकारणावर त्यांच्या समृध्दीचे इमले उभे राहतात त्या जनतेला गृहित धरण्याचे पाप तरी भविष्यात कोणीच करु नये, असा धडा शिकविण्याचा निर्धार नाशिककर करतील ?
जाता जाता – कवी केशवसुतांची कविता मुद्दाम पूर्णपणे दिली आहे. त्यातील एकेक शब्द समाजमनाचा ठाव घेऊ शकेल आणि त्यांना अपेक्षित असलेला आवाज उठेल अशी अपेक्षा.

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून...