Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : श्रद्धा, सबुरी हाच आता आधार !

राज-का-रण : श्रद्धा, सबुरी हाच आता आधार !

नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’- संपादक

- Advertisement -

‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा प्रत्यक्षात जगणारे नाशिकचे असंख्य कार्यकर्ते त्या अर्थाने खरोखरच पोरके झाले. दादांच्या भरवशावर भुजबळांना ज्यांचा कायम विरोध राहिला, ते आता दादाच राहिले नसल्याने काय करणार हा मोठा प्रश्न आहे. सुनेत्रा पवारांकडे पक्षाची जबाबदारी आलेली असल्याने अशा सर्वांना थांबा अन् योग्य संधीची वाट पाहा असे सबुरीचे धोरण अवलंबवावे लागेल.

YouTube video player

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने सारा महाराष्ट्र व्याकूळ झाला आहेच; पण आता त्यांच्यानंतर पुढे काय या प्रश्नाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था दाटली आहे. अजितदादांसारखा खमका नेता सध्या पक्षात दुसरा नाही. असला तरी त्याची झेप सर्वांना पेलण्याएवढी नाही. अशा परिस्थितीत, पक्षाचा नेता कोण, उपमुख्यमंत्रीपदी कोण, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार का, झाल्यास एकीकृत राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, हा नवा पक्ष भाजपबरोबर जाणार की तटस्थ राहणार अशा असंख्य प्रश्नांचे काहूर सुरुवातीला सर्वांच्याच मनात होते.

साहजिकच अजितदादांनंतर कोण या प्रश्नाचा तिढा लवकरात लवकर सुटला तर बरे, अशी सर्वांचीच इच्छा होती. ती अपेक्षेपेक्षा लवकरच फलद्रुप झाली. खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची धुरा तसेच उपमुख्यमंत्रीपदही द्यावे असा मतप्रवाह होताच, त्याला पसंती मिळाली हे बरे झाले. तरीही शुक्रवारी दुपारपर्यंत सुनेत्रा पवार यांना काय वाटते, त्या हे आव्हान स्वीकारायला तयार आहेत का, सध्या त्या दादांच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्यात आहेत. त्यांना सावरू द्यायचे आणि नंतर हे निर्णय करायचे असेही पक्षातील काही नेत्यांसह कुटंबातील घटकांनाही वाटत होते. परंतु राजकारणात असा विलंब लावणे योग्य नाही. जो काही निर्णय करायचा तो तातडीनेच करावा, असा आग्रह धरणारेही होते. पार्थ पवार यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला असला तरी सध्याच्या भावनिक वातावरणात त्यांची स्वीकारार्हता सहज होऊ शकेल. जय पवार सध्या अमेडिया जमीन व्यवहारात अडकलेले असल्याने त्यांच्याबाबत सबुरी ठेवली जाईल, अशी चर्चा होती.

पार्थ पवार हे महत्वाकांक्षी तर आहेतच; शिवाय त्यांना सक्रीय राजकारणही करायचे आहे, हे त्यांनी निवडणूक लढवून दाखवून दिले होतेच. सुनेत्रा पवार यांना पक्षाध्यक्षपदी ठेवून त्यांचे राज्यसभा सदस्यत्व कायम ठेवावे व यथावकाश पक्षावर पकड आल्यानंतर राज्याच्या राजकारणात लक्ष घालावे असे सांगितले जात होते. अजितदादांच्या जागेवर पार्थ यांना विधिमंडळात पाठवता येऊ शकते, असेही बोलले जात होते. प्रत्यक्षात सर्वांनाच धक्का देत सुनेत्रा पवारांसह त्यांच्या दोन्ही मुलांनी तात्काळ निर्णय केला. ज्या परिस्थितीत दादांना इहलोकीची यात्रा संपवावी लागली, तो धक्का ताजा असल्याने या राजकीय बाबी सावकाश होतील, असे वाटत होते. परंतु दादांच्या अकाली जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आणि हे होऊ नये असे ज्या शक्तींना वाटत होते, त्या शक्ती सक्रीय झाल्या.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र झाले तर त्या एकीकृत पक्षात शरद पवार यांचाच शब्द प्रमाण राहील, अशी भीती काहींना वाटली. शिवाय शरद पवार यांच्याच कलाने निर्णय होतील आणि तेव्हा सुप्रिया की सुनेत्रा हा म्हणजेच मुलगी की सून हा तिढा पुढे येईल तेव्हा मुलीच्याच पारड्यात निर्णय होईल, असे सुनेत्रा व दोन्ही मुलांच्या मनात ठसविणे या शक्तींना शक्य झाले. आणि त्यातूनच मग तातडीने सुनेत्रा पवार यांच्या नेतेपदाचा विषय पुढे येऊन लागलीच मार्गीही लागला, असे दिसते.

अजितदादांची अकाली एक्झिट ही अत्यंत वेदनादायी तर आहेच; पण त्यांचे राजकारणातील स्थान पाहाता कुटुंबियांबरोबरच पक्षातील त्यांच्या कार्यकर्त्यांनाही मन घट्ट करून आता पुढील निर्णय करावे लागणार, असे बोलले जात होते. हे काम सोपे अजिबात नाही, याची जाण सर्वांनाच होती. भावनिक वातावरणाचा निर्णयावर पडणारा प्रभाव अन् पक्षाचे भविष्य या तिढ्यातून मार्ग काढावा लागणार होता. गेल्या काही महिन्यांपासून सुनेत्रा पवार या पक्षाच्या काही कामांची जबाबदारी घ्यायला लागल्या होत्या. साहजिकच त्यांच्याकडे निर्विवादपणे नेतृत्व जाऊ शकेल, असे छातीठोकपणे काही जण सांगत होते. पण कुटुंबात याविषयी काही चर्चा होणार असेल तर मग त्याला कदाचित अनेक फाटे फुटू शकतील, अशी शंकाही घेतली जात होती.

मुळात दोन राष्ट्रवादी एकत्र होतील का, झाल्यास त्याचे नेतृत्व कोणी करायचे ही मुलभूत समस्या होती आणि शरद पवार असेपर्यंत ते काय करतील याची कोणालाच खात्री नव्हती. एक चर्चा अशीही होती की, उद्धव व राज ठाकरे हे जसे आपापले पक्ष स्वतंत्र ठेवून एकत्र आले तोच फॉर्म्युला ठेवून सुनेत्रा व सुप्रिया यांच्याकडे त्या त्या राष्ट्रवादीची जबाबदारी देऊन कटुता टाळावी. सुप्रिया सुळे या राजकीय परिपक्वतेबाबत ज्येष्ठ आहेत. अनेक वर्षांपासून त्या सक्रिय राजकारणात तर आहेतच, शिवाय संसदेतही त्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. शरद पवार आता नव्वदीत प्रवेशतील. त्यांची प्रकृती पाहाता त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाचाही निर्णय आज ना उद्या करावा लागणार आहेच. तेव्हा या निमित्ताने दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाचा विषय राज-उद्धव यांच्याप्रमाणे होऊ शकेल, असा तर्क मांडला जात होता.

पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवितांनाच निवडणुका एकत्रित लढवाव्यात आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करावा, असा एक मध्यम मार्ग दोघांशीही जवळीक असणार्‍यांकडून सुचविला जात होता. कल्याण-डोंबिवलीत जसे मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला मदत करण्याचा निर्णय घेतला तसा दोन्ही राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होण्यावरूनही वागू शकतात. आजपर्यंत भाजपसह सर्वांशीच उत्तम संबंध ठेवून शरद पवारांनी थेट भाजपबरोबर कधीच घरोबा केलेला नसल्याने (पुलोदचा अपवाद) आता या वयात ते सत्तेसाठी भाजपबरोबर जातील असे संभवत नाही. सध्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते हे खरे असले तरी शरद पवारांची आजपर्यंतची राजकीय खेळी पाहाता ते किमान उघडपणे तरी भाजपशी संधान साधणार नाहीत, याची जाण असल्यानेच त्यांच्या सावलीतून अजितदादांच्या वारसांना बाहेर काढणे क्रमप्राप्त झाल्याचेही सांगितले जाते. या खेळीमागे कोण असणार याबाबत काही मोजकी नावे पुढे येत असून सध्या राजकारणात त्यांच्याच खेळी यशस्वी होत असल्याने त्यावर कोणाचाही विश्वास बसू शकेल.

अजितदादांच्या पश्चात नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे तब्बल सात आमदार आहेत. मावळत्या जिल्हा परिषदेत पक्षाचे १९ सदस्य होते. याशिवाय सहकारी संस्था, पतसंस्था, साखर कारखाने, बाजार समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये राष्ट्रवादीचा बर्‍यापैकी प्रभाव आहे. आमदारांमध्येही माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, दिलिप बनकर, नितीन पवार हे अजितदादांच्या गोटात तर छगन भुजबळ यांचे स्वतंत्र नेतृत्व होते. हिरामण खोसकर व सरोज अहिरे हे देखील अजितदादांचेच समर्थक असले तरी ते भुजबळांनाही मान देतात. इतर आमदारही भुजबळांना मान जरूर देतात; पण रूढार्थाने त्यांना भुजबळांचे नेतृत्व मान्य नाही. माणिकराव कोकाटे यांचा भुजबळांशी तर थेट संघर्ष आहे. दोघेही जाहीरपणे परस्परांना दूषणे देतांना दिसतात.

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीने माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांना मंत्रिमंडळात घेऊन भुजबळांना बाजूला सारण्याचे धारिष्ट्य दाखविले त्याचे कारणच मुळी सर्वच आमदारांनी भुजबळांना मंत्रीपद देण्यास केलेला विरोध असे सांगितले जाते. नितीन पवार व दिलीप बनकर यांनीही भुजबळांना समर्थन दिले नव्हते. तेव्हा नाराज झालेल्या भुजबळांनी नंतरही बरीच आदळआपट केली. पुढे फडणवीसांच्या आग्रहाखातर भुजबळ मंत्रिमंडळात आले. पण वादग्रस्त विधाने तसेच सरकारी सदनिका प्रकरणाच्या खटल्यात दोषी ठरल्याने कोकाटेंना मंत्रिमंडळातून बाहेर जावे लागले. अर्थात, तत्पूर्वी अनेकदा अनावस्था प्रसंग येऊनही कोकाटेंना अजितदादांनी अभय दिल्याचे दिसले होते. त्यामुळे आता नव्या रचनेत हे सगळे आमदार राज्याच्या पक्षीय राजकारणात काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे राहील.

भुजबळांनी तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्या सोबतीने मुख्यमंत्र्यांना भेटून गतिमान हालचाली तर केल्याच; शिवाय सुनेत्रा पवार यांच्या विधिमंडळ नेतेपदाच्या नावाला अनुमोदन देत पक्षाच्या राजकीय रचनेत आपले स्थान अधिक भक्कम केले. त्यामुळे अजितदादांच्या पश्चात भुजबळांचे स्थान नेमके कुठे व कसे राहील याची चिंता वाटणार्‍या अनेकांना भुजबळांच्या या खेळीने घेरी आली असणार. अलिकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्त केलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीवरून भुजबळ गट व विरोधक यांच्यातील तणाव गाजला. समीर भुजबळ यांनी उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम भुजबळ फार्मवर ठेवण्याला या समितीतील काहींनी आक्षेप घेऊन बैठकीवर बहिष्कार टाकला होता. पुढे त्यातील काहींना समितीतून बाहेर काढून झिरवाळ, खोसकर आदी शहराच्या राजकारणाशी ज्यांचा संबंध नाही त्यांच्याकडे जबाबदारी दिली गेली. माजी खासदार देविदास पिंगळे, माजी स्थायी समिती सभापती निवृत्ती अरिंगळे, अर्जुन टिळे, अनिल चौघुले, डॉ. जाकीर शेख अशा मातब्बर नेत्यांनी नंतर पालिका निवडणुकीतून अंग काढून घेतले.

कोकाटे हे आजारी असल्याने त्यांच्या सक्रियतेचा प्रश्नच नव्हता. दस्तुरखुद्द छगन भुजबळ हे देखील रुग्णालयात असल्याने सगळा कारभार समीर भुजबळ, रंजन ठाकरे व नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर यांनीच पाहिला. आमदार सरोज अहिरे यांनीही आपल्या देवळाली मतदार संघातील प्रभागांसाठी आपलाच हेका ठेवला. यामध्ये अजितदादांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांना नाशिकमध्ये ओळखले जाते ती मंडळी बेदखल राहिली. या संबंधितांनी तेव्हाच दादांना भेटून हा प्रकार कानावर घातला होता, तथापि, दादांनी पिंपरी चिंचवड व पुणे महापालिकांमधील निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असल्याने त्यांनी नंतर नाशिकला येऊ असा शब्द या कार्यकर्त्यांना दिला होता. आता दादाच नसल्याने नाशिकला येऊन या प्रकरणावर मार्ग काढण्याचा विषयही खुंटला. म्हणूनच आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची नाशिकमधील स्थिती काय असेल हा प्रश्न अधिक महत्वाचा झाला आहे. ङ्गएकच वादा अजितदादाफ ही घोषणा प्रत्यक्षात जगणारे नाशिकचे असंख्य कार्यकर्ते त्या अर्थाने खरोखरच पोरके झाले. कारण त्यांचा भुजबळांना कायम विरोध राहिला तो केवळ दादांच्या भरवशावर.

आता दादाच राहिले नसल्याने हा गट काय करणार हा मोठा प्रश्न आहे. सुनेत्रा वहिनींनी पक्षाचा ताबा घेतला तरी त्यांनाही भुजबळांसारख्या ज्येष्ठांना दुखावणे परवडणारे नाही. पक्षातील हे असे अंतर्विरोध त्यातील ताणेबाणे समजून घेत निर्णय करायला थोडा अवधी लागेल. त्यामुळे नाशिकच्या बाबत म्हणायचे तर अजितदादांना मानणार्‍या कट्टर कार्यकर्ता वर्गाला थांबा अन् योग्य संधीची वाट पहा असे सबुरीचे धोरण अवलंबवावे लागेल. श्रद्धा व सबुरीला सध्या तरी पर्याय नाही. हा केवळ नाशिकचा विषय नाही. साधारण प्रत्येक जिल्ह्यात हे असले नाजूक विषय आहेतच. दादांचा दरारा व धाक एवढा होता की त्यांनी केवळ डोळे मोठे केले तरी भल्याभल्यांची भंबेरी उडायची. आती तीच मंडळी तोंड वर करून कदाचित बोलूही शकतील. अशा बोलणार्‍या व न बोलणार्‍यांंनाही समजून घेत सुनेत्रा वहिनींना पक्ष संघटनेला पुढे न्यावे लागेल. भाजपच्या विस्तारवादी धोरणाच्या परिस्थितीत राष्ट्रवादीसाठी हा काळ मात्र अत्यंत कठीण आहे, हे नि:संशय! हे सारे आव्हान पेलण्याची ताकद नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मिळो, ही शुभेच्छा…

ताज्या बातम्या