Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशदहशतवादाविरोधातील भारताची भूमिकाही स्पष्ट; चीन मधील बैठकीत राजनाथ सिंहांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

दहशतवादाविरोधातील भारताची भूमिकाही स्पष्ट; चीन मधील बैठकीत राजनाथ सिंहांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या अनेक वर्षांपासून भारताविरोधातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तान आपल्या भूमीमधून सातत्याने खतपाणी घालत आला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत भारताचे हजारो जवान आणि सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काही देश आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून सीमापार दहशतवादाचा वापर करतात व दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा दुहेऱ्या भूमिकांसाठी जागतिक समुदायात कोणतेही स्थान नसावे. दरम्यान, सध्या चीनमधील किंगदाओ येथे सुरू असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्येही भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे पडसाद उमटले असून, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीनसमोरच पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत.

विकृतींचा निर्णायक मुकाबला केला पाहिजे
“आपल्या क्षेत्रासमोरील सर्वात मोठी आव्हाने म्हणजे शांतता, सुरक्षा आणि परस्परविश्वासाचा अभाव आहे. या समस्यांच्या मुळाशी दहशतवाद, अतिरेकी प्रवृत्ती आणि धर्मांधतेचे वाढते प्रमाण हे आहे. दहशतवाद व महासंहारक शस्त्रांचा गैरराज्य घटकांच्या व दहशतवादी संघटनांच्या हाती होणारा प्रसार यांच्यासह शांतता व समृद्धीचा सहअस्तित्व शक्य नाही. या आव्हानांना तोंड देण्यासाठी ठोस कृती आवश्यक असून आपण सर्वांनी एकत्र येऊन या विकृतींचा निर्णायक मुकाबला केला पाहिजे,” असे आवाहन यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

- Advertisement -

…तर परिणाम भोगावे लागतील
राजनाथ सिंह म्हणाले का, जे लोक दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. तसेच आपल्या संकुचित आणि स्वार्थी हेतूंसाठी दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. काही देश सीमेपलीकडून दहशतवादाला एक धोरण म्हणून वापरत आहेत. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत. अशा दुटप्पी भूमिकेला कुठलेही स्थान असता कामा नये. तसेच एससीओने अशा देशांचा निषेध करण्यासाठी कुठलीही शंका बाळगता कामा नये.

YouTube video player

जगासमोर आर्थिक पुनर्बांधीचे मोठे आव्हान
“कधी काळी जगाला एकत्र आणणारी जागतिकीकरणाची प्रक्रिया आता मंदावली आहे. आज जगासमोर शांतता, सुरक्षिततेबरोबर कोरोना महामारीनंतरच्या आर्थिक पुनर्बांधणीचे मोठे आव्‍हान आहे. त्‍यामुळे देशांदरम्यानच्या संघर्षांना टाळण्यासाठी संवाद व सहकार्य हेच देशादेशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा भारताचा ठाम विश्वास असल्‍याचेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

राजनाथ सिंहांनी ठणकावले
यावेळी राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरोधातील भारताची भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले की, दहशतवादाविरोधात भारताचे धोरणं त्याच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. यामध्ये दहशतवादाविरोधात स्वत:चे संरक्षण करण्याच्या आमच्या अधिकाराचाही समावेश आहे. दहशतवादाची केंद्रे कुठे आहेत हे आम्ही दाखवून दिले आहे. दहशतवादाची ही केंद्र आता सुरक्षित नाही आहेत. तसेच आम्ही त्यांना लक्ष्य करण्यास मागे पुढे पाहणार नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे, असेही राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...