Saturday, November 9, 2024
Homeदेश विदेशमाझा रोज अपमान होतोय, सभापती धनखड रागातच खुर्चीतून उठून गेले; नेमके काय...

माझा रोज अपमान होतोय, सभापती धनखड रागातच खुर्चीतून उठून गेले; नेमके काय घडले?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठणारी कुस्तीपटू विनेश फोगाट १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने अपात्र ठरल्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला. आज या विषयावरुन विरोधकांनी राज्यसभेमध्ये जोरदार घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घातला. यावरुन राज्यसभेचे सभापती आणि विरोधी पक्षांमधील खासदारांमध्ये शाब्दिक चकमक उडली, ज्यामुळे उपराष्ट्रपती आणि सभापती जगदीप धनखड हे खुर्चीतून उठून निघून गेले. रागातच जगदीप धनखड यांनी मोठ्या आवाजात म्हटले की, सदनात दररोज माझा अपमान होतोय. सभापतींवर ओरडण्याची तुमची हिंमतच कशी झाली?

राज्यसभेत नेमके काय घडले?
भारताची स्टार कुस्तिपट्टू विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याचा मुद्दा संसदेत गाजला. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. पण सभापती धनखड यांनी त्यांना परवानगी दिली नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सभापतींनी त्यांना इशारा दिला. पुन्हा असा प्रकार केलात, तर तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, असा इशारा धनखड यांच्याकडून देण्यात आला. यानंतर काँग्रेस, तृणमूलसह विरोधी पक्षातील अन्य खासदारांनी सभात्याग केला.

- Advertisement -

डेरेक ओब्रायन आणि इतर विरोधी पक्षाच्या खासदारांच्या वर्तनावर सभापती धनखड यांनी म्हटलं की, पत्र आणि वर्तमान पत्रांच्या माध्यमातून सभापतींच्या अधिकारांना आव्हान देणे असंसदीय आहे. हे माझ्यासाठी आव्हान नाही तर राज्यसभेच्या सभापती पदाला आव्हान आहे. तुम्हाला वाटते की या खुर्चीवर बसलेली व्यक्ती या पदासाठी लायक नाही. काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यावर निशाणा साधताना हसू नका असे सांगितले. त्यानंतर मी दु:खी मनाने खुर्चीतून उठतोय असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षाकडून सतत घोषणाबाजी सुरु होती, यावर सभापती धनखड यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना बाजू मांडण्याची संधी दिली. यावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सर मला इतकंच म्हणायचंय की आम्ही हा मुद्दा फक्त उचलून धरला आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जगदीप धनखड यांनी मधेच थांबवत म्हटलं की, तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्हाला यावर चर्चा हवीय का? तेव्हा खर्गे यांनी हो, आम्हाला चर्चा करायची आहे, यामागे कोण आहे? फक्त १०० ग्रॅम वजनामुळे असे झाले? असे विचारले. तेव्हा जगदीप धनखड यांनी थांबवत काहीही रेकॉर्डमध्ये जाणार नाही. आम्ही तुम्हाला अशा पद्धतीने सदनाला प्लॅटफॉर्म बनवू देणार नाही. तुम्हाला नियम मान्य करावे लागतील.

विनेशला अपात्र ठरवण्यात आले. त्याचे दु:ख संपूर्ण देशाला आहे. त्याचे राजकारण करु नका. एखाद्या पदक विजेत्याला जे जे दिले जाते, ते ते सगळे आपण तिला देऊ. आपण तिला पूर्ण सहाय्य करु. पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की याचे राजकारण करु नका, असे धनखड सदनातील सदस्यांना उद्देशून म्हणाले. यानंतर काँग्रेस, तृणमूलसह विरोधी पक्षातील सदस्य सदनातून बाहेर पडले.

‘सदनाचे पावित्र्य कमी करु नका. मर्यादा सोडू नका. काही खासदार चुकीच्या पद्धतीने टिप्पणी करतात. मला सदनाकडून अपेक्षित सहकार्य, पाठिंबा मिळत नाही. माझ्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता राहिलेली नाही. आता माझ्याकडे एकच पर्याय शिल्लक आहे. मी माझ्या शपथेपासून पळ काढत नाहीए. मी आज जे पाहिले, अनुभवले. ज्या प्रकारची वर्तणूक मला देण्यात आली, मी काही वेळासाठी इथे बसण्यास सक्षम नाही असे मला वाटते,’ असे म्हणून धनखड सभागृह सोडून निघून गेले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या