नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सर्वोच्च न्यायालयात काल (सोमवारी) सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी म्हटले आहे की, त्यांना या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. याचबरोबर, “आपण तुरुंगवास भोगण्यास तयार आहोत” आणि “दैवी शक्तीमुळे” हे कृत्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे, असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
सोमवारी (६ ऑक्टोबर) सकाळी ११:३५ वाजण्याच्या सुमारास खंडपीठात सुनावणी सुरु असताना हा प्रकार घढला. खजुराहो येथील एका मंदिरातील भगवान विष्णू यांची खंडीत मूर्ती व्यवस्थित करण्यासंदर्भातील एका याचिकेवर सरन्यायाधीश बी.आर. गवई सुनावणी करत असतानाच हा प्रकार घडला. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी तात्काळ कारवाई करत राकेश किशोर यांना ताब्यात घेतले.
नेमके काय म्हणाले राकेश किशोर?
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी, या कृत्यासंदर्भात आपल्याला कसलाही पश्चात्ताप नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “मला एका दैवी शक्तीने असे करण्यास सांगितले होते. मी जेलमध्ये गेलो असतो तर बरे झाले असते. माझे कुटुंबियही माझ्या या कृत्यामुळे नाराज आहेत. त्यांना समजत नाहीये.” त्यांच्या या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
खजुराहो खटल्यातील विष्णू मूर्तीचा संदर्भ देत किशोर म्हणाले की, “त्या निकालानंतर मला झोप येत नव्हती. सर्वशक्तिमान देव मला दररोज रात्री विचारत होते की, इतक्या अपमानानंतरही मी इतका शांत कसा राहू शकतो.”
त्यांनी पुढे सांगितले की, मॉरिशसमधील सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या भाषणाबद्दल कळल्यानंतर ते आणखी संतप्त झाले होते. जिथे बी. आर. गवई म्हणाले होते की, “भारताची न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमांनुसार चालते, बुलडोझरच्या नियमांनुसार नाही.”
किशोर पुढे म्हणाले, ‘ज्यावेळी नुपूर शर्माचे प्रकरण कोर्टासमोर येते त्यावेळी कोर्ट म्हणते की तिने वातावरण दुषित केले. ज्यावेळी सनातन धर्माचा विषय येतो त्यावेळी सर्वोच्च न्यायालय अशा प्रकराचे आदेश देते. याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दिला जात नाही. उलट ते त्यांची चेष्टा करतात.’
‘यामुळे मी खूप दु:खी झालो होतो. मी कोणताही नशा केला नव्हता. ही माझी त्यांच्या क्रियेला दिलेली प्रतिक्रिया होती. मी कोणालाही घाबरत नाही. जे काही झाले त्याचा मला कोणताही पश्चाताप नाही.’
बार काऊंसिलने केले निलंबित
बार काउंसिल ऑफ इंडियाने (बीसीआय) या घटनेची गंभीर दखल घेत राकेश किशोर यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. बीसीआयचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अधिवक्ता मनन कुमार मिश्रा यांनी जारी केलेल्या अंतरिम निलंबन आदेशात म्हटले आहे की, राकेश किशोर यांचे हे कृत्य न्यायालयाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. तसेच हे अधिवक्त्यांच्या आचारसंहितेचा आणि अधिवक्ता अधिनियमाच्या, १९६१ च्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





