नवी दिल्ली | New Delhi
लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) आज देशात नवे सरकार स्थापन होणार आहे. संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात एनडीए सरकारचा (NDA Government) शपथविधी सोहळा पार पडणार असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, त्यापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांना दिल्लीतून फोन आले आहेत. यात उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनाही फोन आला असून त्या आज संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधतांना रक्षा खडसेंनी मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलतांना खडसे म्हणाल्या की, “माझी राजकारणाची सुरुवात एकनाथ खडसे यांच्यापासून झाली आहे. माझ्या राजकीय प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. माझ्या माहेरच्या लोकांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. सामाजिक कामाची आवड मला माझ्या वडिलांपासून मिळालेली आहे. एका राजकीय घराण्यात मी सून म्हणून आले. नाथाभाऊ यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. माझ्या आयुष्यातील बरीच परिस्थिती बदलत गेली. त्या परिस्थितीत नाथाभाऊंनी मला खूप साथ दिली आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांसह सर्व जनतेने मला साथ दिली आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे”, असे रक्षा खडसे यांनी म्हटले.
पुढे बोलतांना खडसे म्हणाल्या की, “लोकसभा निवडणुकीतील विजयाचे आणि या यशाचे श्रेय जनतेला द्यावे लागेल. कारण जनतेमुळेच मी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहे. यासह आमच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानते, त्यांच्या योगदानामुळे मी निवडून आले आहे. तसेच माझ्यासाठी ही निवडणूक आव्हानात्म्क होती. परंतु, जनता माझ्याबरोबर ठामपणे उभी राहिली. त्यामुळे मला चांगले यश मिळाले. तसेच मी तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे, हे (मंत्रिपद) त्याचंच फळ आहे असे आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर पक्षाने माझ्यावर इतका मोठा विश्वास दाखवला त्याबद्दल मी पक्षाची आभारी आहे”, असेही रक्षा खडसेंनी सांगितले.
गेल्यावेळी उत्तर महाराष्ट्रातून डॉ. भारती पवारांना मंत्रिपदाची संधी
गेल्या वेळी उत्तर महाराष्ट्रातून दिंडोरीच्या तत्कालीन खासदार डॉ. भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यावेळी पवार यांच्याकडे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी पराभव केला आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या आठ जागा असून त्यापैकी महायुतीने केवळ दोन जागा जिंकल्या आहेत. यामध्ये जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आणि रावेरमधून रक्षा खडसे विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये आता रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
आतापर्यंत ‘यांना’ आले मंत्रिपदासाठी फोन
१) जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा २) जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल ३) अनुप्रिया पटेल, अपना दल ४) डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी ५) के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी ६) नितीन गडकरी, भाजप ७) राजनाथ सिंह, भाजप ८) अमित शाह, भाजप ९) अर्जुनराम मेघावाल, भाजप १०) पियुष गोयल, भाजप, ११) मनसुख मांडविय, भाजप १२) ज्योतिरादित्य शिंदे, भाजप १३) रक्षा खडसे, भाजप १४) मुरलीधर मोहोळ,भाजप १५) रामदास आठवले (रिपाइं (ए)) १६) रामनाथ ठाकुर, जनता दल युनायटेड १७) एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर, १८) सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन १९) चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) २०) प्रतापराव जाधव, शिवसेना (शिंदे गट)