नागपूर | Nagpur
गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीची निवड करण्यात आली आहे. विधानपरिषदेमध्ये गुरवारी सकाळी सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड करण्यात आली.
सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने उमेदवार दिला नाही. शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची कालच निवड निश्चित झाली होती. यानंतर आज, गुरुवारी (१९ डिसेंबर) विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी प्रा. राम शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला. यानंतर सभागृहातील सर्वांनी राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी होकार दिला. सर्व आमदारांनी राम शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सर्व नेत्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आल्यापासून सभापतिपद रिक्त होते. त्यामुळे राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता. यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. यानंतर आज विधान परिषदेत राम शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत ते सभापतीपदी विराजमान झाले.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापतीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. तसे प्रयत्नही शिंदे गटाकडून करण्यात आले. मात्र, विधान परिषदेतील भाजपचे संख्याबळ पाहता त्यांच्याकडूनच या पदावर दावा केला जाणार, हे निश्चित मानले जात होते. भाजपमध्ये राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावांचीही चर्चा होती. तरीही भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून शिंदे यांच्या नावाला पसंती दिली गेली. त्यानुसार बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे अर्ज सादर केला. तर आज त्यांच्या निवडीची एकमताने अधिकृत घोषणा झाली.