मुंबई | Mumbai
राज्यात सध्या विधान सभेचे वारे वाहत आहे. त्यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांना आरपीआय पक्षात एकत्र येण्याचे आवाहन करत रामदास आठवलेंनी आरपीआयचे नेतृत्व सोडण्याची तयारी दर्शवली आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआय सोबत यावे. मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता रामदास आठवले यांच्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी विधानसभेच्या जागा वाटपावरुनही महायुतीला मोठा इशारा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला ८ ते १० जागा मिळाव्यात, अशी मागणी करत महायुतीमध्ये आम्हाला गृहीत धरून काम करू नका, असा मोठा इशाराही दिला. तसेच राज्यात महायुतीच्या १७० चा पुढे जागा निवडून येतील’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मी ज्यांच्या सोबत असतो त्यांचे सरकार येते, अशी मिश्किल टिप्पणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे.तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरी कायदा आणणार असे वक्तव्य केले आहे. त्या बाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी कायदा आला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा