मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) तसेच ठाकरे गटाचे प्रमख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. ते जालन्यात बोलत होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेत्यांच्या एकत्र येण्याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.
यावेळी रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले की, ” शरद पवार आणि अजित पवार पूर्वी एकत्र होते, आजही आहेत. अजित पवारांचे म्हणणे स्पष्ट होते, शिवसेना (Shivsena) चालते तर भाजप का नाही? शरद पवार जर आमच्यासोबत आले असते, पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम केले असते, ते देशाचे राष्ट्रपती झाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा देतील, तर त्यांचं स्वागत आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना एकत्र यावे लागेल. तरी मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा आम्हाला फायदा होईल. दोघांना एकत्रित यायचं असेल तर त्यांनी यावं. पण, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) फारसा बदल होणार नाही”, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीची गरज नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी आपल्यामुळे झाल्याचा दावा केला आहे. तसेच आपण पाकव्याप्त काश्मीरबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यावर बोलतांना रामदास आठवले म्हणाले की, “पाकिस्तान हा आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण, पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यात आले पाहिजे, त्यासाठी युद्ध केले पाहिजे. वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतले पाहिजे, ही भूमिका मी अनेक वेळा मांडली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि कोणाचीही आम्हाला यामध्ये मध्यस्थीची गरज नाही, असे त्यांनी म्हटले.