मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सनसनाटी आरोप करून त्यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईत सावली नावाचा डान्सबार असून पोलिसांनी छापा टाकून तेथून २२ बारबाला ताब्यात घेतल्याचे परब यांनी सांगत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परब यांनी विधान परिषदेत बोलत असताना सरकारला धारेवर धरले. दरम्यान, योगेश कदम यांचे वडील व माजी मंत्री रामदास कदम यांनी कबूल केले आहे की कांदिवलीत पोलिसांनी कारवाई केलेला बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे. मात्र दुसऱ्या व्यक्तीला चालवायला दिल्याचे सांगत परब यांनी चुकीची माहिती सभागृहाला देऊन दिशाभूल केल्याचा पलटवार रामदास कदम यांनी केला.
अनिल परब यांनी अर्धवट माहिती घेऊन ‘सावली डान्सबार’बाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जाणुन बुजून त्यांनी खोटी माहिती सभागृहाला दिली. ही बाब अतिशय गांभीर्याने विधान परिषदेच्या सभापतींनी घेतली पाहिजे. आम्ही तो डान्सबार चालवित नसल्याचे रामदास कदम म्हणाले.
आमचा बार शेट्टी नावाचा इसम चालवतो
“सावली बार गेल्या ३५ वर्षांपासून माझा आहे. आमचा तो बार गेल्या ३० वर्षांपासून एक शेट्टी नावाचा इसम चालवतो आहे. हे वास्तव आहे की त्या हॉटेल आणि बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावाने आहे. तसेच तिच्या नावाने ऑर्केस्ट्राचा परवाना देखील आहे. मुलींचे वेटरचे लायसन्स देखील आमच्याकडे आहे. परंतु, ते काही अनधिकृत नाही. तिथे अनधिकृतपणे डान्स चालत नाही. पोलिसांनी ज्यावेळी तिकडे छापा टाकला आणि त्यांना काही चुकीच्या गोष्टी तिथे आढळून आल्या. त्यावेळी आम्ही ताबडतोब त्याच्यासोबतचा करार रद्द करून टाकला”, असे रामदास कदम म्हणाले.
अब्रूनुकसानीचा दावा करता येतोय का? याची चाचपणी करत आहे
मुली असलेले हॉटेल आणि ऑर्केस्ट्रा बार आम्ही बंद केलेले असून त्याबाबतचे पुरावे आम्ही आयुक्तांकडे सादर केलेले आहेत. ऑर्केस्ट्रा हा बॉम्बे प्रोविजन ॲक्टखाली येत नाही. ऑर्केस्ट्रा हा ऑफ स्क्रीन डान्स इन हॉटेल २०१६ कलम ८ मध्ये येतो. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की करार करून जो इसम हॉटेल चालवतो, त्याची सर्व जबाबदारी असते, मालकाची नाही. हा कायदा असतानाही अनिल परब यांनी मालक म्हणून आम्हालाच दोषी धरले. मालकावर गुन्हा दाखल व्हावा आणि राज्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला. आताच्या घटनेचा आणि राजीनाम्याचा काय संबंध? अनिल परब केवळ मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मी देखील आता वकिलांचा सल्ला घेऊन अनिल परब यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करता येतोय का? याची चाचपणी करत आहे.” असा सवाल कदम यांनी विचारला.
एफआयआरमध्ये नेमकं काय म्हंटले आहे?
कांदिवलीत सावली बारवर ३० मे २०२५ रोजी धाड.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावे सावली बार.
३० मे रोजी रात्री १०. ५० ते पहाटे ४ वाजेपर्यंत धाड.
बारमध्ये २२ बारबाला, २५ ग्राहक अन् ३ कर्मचारी.
काही बारबाला अश्लील नृत्य करत असल्याचे आढळले.
धाडीनंतर वेटर, कॅशियर, मॅनेजर पोलिसांच्या जाळ्यात.
बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे – मॅनेजरचा जबाब.
समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
३१ मे पासून सावली बार बंद.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




