Tuesday, September 17, 2024
Homeनगररामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाका

रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाका

हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महंत रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाका, असे थेट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांबाबत चुकीचं विधान केल्याचा आरोप स्वामी रामगिरी महाराजांवर आहे. महंत रामगिरी महाराज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे मोहम्मद पैगंबर व मुस्लिम समाजाची बदनामी होत आहे. मुंबई पोलीस आयुक्त व कांदिवली पोलिसांकडे याची रितसर तक्रार करण्यात आली. मात्र पोलीस काहीच कारवाई करत नाही. तेव्हा न्यायालयानंच याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश देत सोशल मीडियावरुन हे व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत अमिन इद्रीसी यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. रामगिरी महाराजांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होत आहे. त्याने सामाजिक सलोखा बिघडून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील एजाज नख्वी यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं हे व्हिडिओ तात्काळ हटवण्याचे आदेश देत पुढील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

रामगिरी महाराज यांच्यावर राज्यभरात 58 गुन्ह्यांची नोंद
रामगिरी महाराज यांच्या व्हिडिओवर आक्षेप घेत राज्यभरात एकूण 58 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी नोंदवलेले हे गुन्हे एकत्रित करुन सिन्नर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेत, अशी माहिती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी यावेळी खंडपीठाला दिली. त्याची नोंद करुन घेत या तपासासाठी सायबर सेलची मदत घ्या, अशी सूचना हायकोर्टानं मुंबई पोलिसांना केलीय.

- Advertisment -

ताज्या बातम्या