भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.
स्व राज्यरक्षणी फिरंगमर्दिनी राणी लक्ष्मी जयते विरांगणी शस्त्रधारिणी समर भवानी गंगाधर भार्या झाशी सम्राज्ञीनी
राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूवर झंझावाताप्रमाणे तुटून पडून अखेरच्या श्वासापर्यंत लढणार्या, मेरी झाशी नही दूंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणार्या राणी लक्ष्मीबाईंनी फक्त रणच गाजवले नाही तर देशवासियांच्या हृदय-मनात राष्ट्रप्रेमाची, देशभक्तीची ज्वाला प्रकट केली. राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या प्रजेवर अपत्यवत प्रेम केले. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांना रणांगणात शत्रूशी लढता लढता हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या कृतीतून महिलांचे नाव गर्वाने उंच झाले. राणी लक्ष्मीबाईंचे जीवन म्हणजे अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची देदीप्यमान गाथाच आहे.
महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका. पेशव्यांच्या पदरी असणार्या मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी जन्म झाला. त्यांना जवळच्या व्यक्ती ‘मनू’ नावाने संबोधत. बालवयातच आईचे छत्र नाहीसे झाल्यामुळे मनूचे बालपण पेशव्यांच्या वाड्यात नानासाहेब पेशव्यांबरोबर गेले. वडील मोरोपंत यांनीही आपल्या मुलीतील चुणूक, वेगळेपण, बुद्धिमत्ता तिच्या लहानपणीच ओळखली. त्यांनी कायम मनूला नानासाहेबांबरोबर शिक्षण तसेच शस्त्र शिक्षण व घोडेस्वारीसाठी प्रोत्साहन दिले. मनू बालवयात मल्लखांब विद्येतही प्रवीण झाली होती. त्यामुळे तिच्यात मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्रभान निर्माण झाले होते. नानासाहेब पेशवे मनूला बहीण मानायचे. बालपणी मिरवणुकीत नानासाहेब पेशव्यांबरोबर हत्तीवरील हौदात बसता न आल्याने छोटी मनू आत्मविश्वासाने म्हणाली होती, असे दहा हत्ती माझ्या दारात झुलतील आणि हा विश्वास खरा ठरला.
19 मे 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. महाराज गंगाधर नेवाळकर यांच्या घराण्याला झाशी संस्थानची सुभेदारी प्राप्त झाली होती. परंतु ते मूळचे रत्नागिरी येथील. पुढे हिंदुस्थानवर इंग्रजांचा प्रभाव वाढला. इ. स. 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झाशी वंशपरंपरागत घेऊन महाराजा ही पदवी धारण केली.
लग्न झाले तरी राणी लक्ष्मीबाईंनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. त्यांचे वय लहान असले तरी निर्णय क्षमता, समजदारी खूप होती. सर्वसामान्यांमध्ये मिसळणे, सुखदुःखात मदत करण्याच्या स्वभावामुळे त्या जनतेमध्ये लोकप्रिय झाल्या. आपली राणी म्हणून लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता. किल्ल्यातील व परिसरातील मुली, महिलांनाही त्यांनी शस्त्र अभ्यासासाठी उद्युक्त केले. लक्ष्मीबाईंनी स्त्रियांचा एक गट लढाईचे शिक्षण देऊन तयार केला होता. घोड्यावर बसणे, बंदुका व तोफा चालवणे, भालाफेक, तलवारीचे हात व पोहणे असे शिक्षण मुली, स्त्रियांना स्वतः देऊन त्यांच्या रूपात झाशीच्या भविष्यातील रक्षक महिलांची सैन्य तुकडीच जणू त्यांनी निर्माण केली. राणी लक्ष्मीबाईंचे विशेष असे की त्या काळात संपूर्ण हिंदुस्थानात अश्व परीक्षेचे मापदंड माहीत असणार्या तेव्हा फक्त तीन व्यक्ती होत्या, एक नानासाहेब पेशवे, दुसरे जयाजी शिंदे आणि तिसर्या खुद्द महाराणी लक्ष्मीबाई. त्या घोडेस्वारीत वाक्बार होत्या. या दाम्पत्याला पुत्ररत्न झाले. राणी लक्ष्मीबाई मुलाच्या संगोपनात व्यस्त झाल्या पण झाशीचा हा आनंद क्षणभंगुर ठरला. अवघ्या तीन महिन्यांच्या या बाळाचा मृत्यू झाला. या दुःखातून वर येण्यासाठी महाराज गंगाधरराव यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलास दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदर असे ठेवले. परंतु पोटच्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून ते सावरू शकले नाहीत. 21 नोव्हेंबर 1853 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. झाशी दुःखात बुडाली. राणी लक्ष्मीबाई लहानग्या दामोदरला सांभाळत राज्यकारभार पाहू लागल्या.
तत्कालीन हिंदुस्थानात वेगवेगळ्या कारणांनी ब्रिटीश सरकार ईस्ट इंडिया कंपनी संस्थाने, राज्य यावर आपले अधिराज्य स्थापत होते. झाशीच्या राज्यावर कर्जाचा बोजा दाखवत ईस्ट इंडिया कंपनीने राणी लक्ष्मीबाईंना त्रस्त केले होते. अंतर्गत कलहांनाही राणी लक्ष्मीबाईंना तोंड द्यावे लागत होते. महाराज गंगाधरराव यांच्या मृत्यूनंतर गव्हर्नर जनरल डलहौसीने दत्तक वारस नामंजूर करून झाशीचे राज्य खालसा करण्याचा जाहीरनामा 13 मार्च 1854 साली काढला. तेव्हा कंपनी सरकारच्या या बेजबाबदार कृत्याला व अधिकाराला नाकारत राणी लक्ष्मीबाईंनी त्यांना ठणकावून उत्तर दिले ‘मेरी झाशी नही दूंगी….!’
इंग्रज अधिकार्याच्या अरेरावीपणामुळे झाशी खालसा झाल्यावर राणी लक्ष्मीबाईंना झाशीचा किल्ला त्यागून काही काळ शहरातील राजवाड्यात शांत बसावे लागले. ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे हे अन्यायी, अत्याचारी वागणे राणी लक्ष्मीबाई आणि प्रजेला मान्य नव्हते. 1857 च्या काळात संपूर्ण हिंदुस्थानातच ईस्ट इंडिया कंपनीचे अन्याय, अत्याचार वाढले होते.त्याविरोधात हिंदुस्थानमध्ये असंतोषाचे, विद्रोहाचे वातावरण निर्माण झाले होते. झाशीमधील सैनिकांनी इंग्रजांना पळवून लावले. या विद्रोहाला दाबण्यासाठी इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईंना 22 जुलै 1857 ला झाशीचे अधिकार सूत्रे परत दिली. तथापि झाशीचा खजिना रिकामा झाला होता आणि मनुष्यबळही नव्हते. अशा बिकट परिस्थितीत लक्ष्मीबाईंनी अतिशय खंबीरपणे राज्यकारभाराची परिस्थिती हाताळली. याचवेळी शेजारील राज्य ओरछा आणि दतिया येथील राजांनी झाशीवर आक्रमण केल्यामुळे त्यांच्याशी राणी लक्ष्मीबाईंना लढावे लागले. यानंतर लगेचच इंग्रज अधिकारी सर व्ह्यू रोज याने झाशी राज्याची लूटपाट करत झाशी किल्ला ताब्यात घेतला. राणी लक्ष्मीबाई आपला मुलगा दामोदर आणि निवडक सैन्य घेऊन तात्या टोपे यांच्यासोबत 102 किलोमीटरचा प्रवास करत काल्पी येथे पेशव्यांना जाऊन मिळाल्या. सर व्ह्यू रोज याने काल्पीवर आक्रमण केले. राणी लक्ष्मीबाईंनी मोठ्या पराक्रमाने त्याला हरवले. काही काळाने त्याने नव्या दमाने राणी लक्ष्मीबाईवर हल्ला चढवून त्यांना हरवले. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईंनी तात्या टोपे आणि सैनिकांना घेऊन ग्वाल्हेर सर केले व ते पेशव्यांच्या स्वाधीन केले. 18 जून 1858 रोजी सकाळी ब्रिटीश अधिकारी स्मिथने मोठ्या सैन्यानिशी ग्वाल्हेरवर हल्ला चढवला. राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या सैनिकांचे कडे तोडूत रणांगणावर धाव घेतली. त्या ब्रिटीश सैन्याला कापून काढत होत्या. स्मिथचे सैन्य मागे हटायचे नाव घेत नव्हते. त्याचवेळी इंग्रजांची नव्या दमाची तुकडी चालून आली. अनेक शत्रू सैनिकांच्या वेढ्यात राणी लढत होती. या लढाईत एका सैनिकाने राणीच्या मागच्या बाजूने डोक्यावर वार केला तर एकाने पुढून डाव्या कुशीत तलवार खुपसली. राणी लक्ष्मीबाई घोड्यावरून खाली कोसळल्या. आपला देह इंग्रजांच्या हाती लागू नये असे त्यांनी सेवकांना सांगितले. त्यांच्या इच्छेनुसार एका शेतात गवताच्या गंजीवर सेवकांनी त्यांना मोठ्या दु:खद अंतःकरणाने मुखाग्नी दिला. अवघ्या 23 व्या वर्षी रणांगणावर लढता लढता राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण प्राप्त झाले.
राणी लक्ष्मीबाईंच्या प्रभावी नेतृत्वामुळे झाशीतील सैन्य, प्रजा आणि त्यातही मध्य प्रदेशातील अनेक स्त्रिया युद्धात सहभागी झाल्या होत्या. जगाच्या इतिहासातील ही अद्वितीय घटना होती. लक्ष्मीबाईंच्या दोन दासी काशी व सुंदर या युद्धकलेत प्रवीण होत्या. लक्ष्मीबाई रात्रीच्या किल्ला सोडून गेल्या, तेव्हा काशी विधवा राणीचे सोंग घेऊन किल्ल्यात थांबली. सुंदर, काशी शेवटपर्यंत राणीबरोबर लढत राहिल्या आणि हुतात्मा झाल्या. ललिता बक्षी नावाची एक प्रसिद्ध घोडेस्वार राणीच्या सेनेत होती. फुलकरी नावाची महिला गस्त घालणे, गवंडी काम करणे यात वाक्बगार होती. मोतीबाई नावाची महिला बुद्धिमान व मुत्सद्दी होती. लढाईचा आराखडा व सैन्याच्या व्यूहरचनेत तिचा सल्ला महत्त्वाचा मानला जात असे. अझीजन नावाची कलावंतीन ब्रिटिशांच्या सैन्यातून बातम्या काढून आणण्याचे काम करे. लाल किल्ल्याच्या बाहेर कधीही पाऊल न ठेवणार्या दिल्लीच्या बादशहाची बेगम झीनत महल हिने राणी लक्ष्मीबाईंच्या प्रेरणेने 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांना आपसातील मतभेद मिटवून एक होण्याचे आवाहन केले. अवधची बेगम हसरत महल हिने ब्रिटिशांविरुद्ध ठणकावून लढा दिला. सर्वसाधारण स्रीवर्गात राष्ट्रप्रेमाचे, आत्मसन्मानाचे स्फूल्लिंग चेतवण्याचे श्रेय राणी लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वालाच जाते.