नवी दिल्ली | New Delhi
नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे थोड्याच वेळात तिसऱ्यांदा पंतप्रधान (Prime Minister) म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडणार असून मोदी यांच्यासह इतर ६५ खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागले आहे.
यंदा मोदींच्या ३.० सरकारमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर मोदी सरकार २.० मध्ये अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या भाजपच्या २० दिग्गजांची नावे नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत नसल्याचे समोर आले आहे. यात स्मृती ईराणी, रावसाहेब दानवे, अनुराग ठाकूर, कपिल पाटील, डॉ. भारती पवार या पराभव झालेल्यांसह जिंकलेल्यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, काही तासांपूर्वी पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हे नेते सहभागी झाले नव्हते. यावरून त्यांचा यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मोदींच्या ३.० सरकारमध्ये महाराष्ट्रातून सहा जणांना संधी देण्यात आली आहे. यात नितीन गडकरी, पियूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे.
मोदी २.० सरकारमधील या २० मंत्र्यांचा पत्ता कट
१) रावसाहेब दानवे २) कपिल पाटील ३) डॉ. भारती पवार ४) अश्विनी चौबे ५) नारायण राणे ६) डॉ. भागवत कराड ७) अजय भट्ट ८) साध्वी निरंजन ज्योति ९) मीनाक्षी लेखी १०) राजकुमार रंजन सिंह ११) जनरल वीके सिंह १२) आरके सिंह १३) अर्जुन मुंडा १४) स्मृती इराणी १५) अनुराग ठाकुर १६) राजीव चंद्रशेखर १७) निशीथ प्रमाणिक १८) अजय मिश्रा १९) टेनी सुभाष सरकार २०) जॉन बारला