अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात पसार झालेल्या संशयित आरोपीस राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. देवीलाल भुराराम केडोलिया (रा. बावडी, ता. मौलसर, जि. डीडवाना-कुचामन, राज्य राजस्थान) असे त्याचे नाव आहे.
13 मे 2025 रोजी पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, देवीलाल केडोलिया याने तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले. तू तुझ्या नवर्याला घटस्फोट दे, आपण लग्न करू असे सांगून नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत बोल्हेगाव फाटा येथील भाड्याच्या खोलीत वेळोवेळी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीच्या मोबाईल नंबर व लोकेशनचा तांत्रिक तपास केला असता तो सध्या राजस्थानमध्ये लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली. पथक त्याच्या शोधासाठी राजस्थानला गेले. बावडी येथे पोलिसांनी सावधगिरीने आरोपीला अटक करून त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने आपली ओळख देविलाल भुराराम केडोलिया असे सांगितले.
त्यास ताब्यात घेऊन अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून सदर आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कामगिरी सहायक निरीक्षक चौधरी, पोसई विकास जाधव, अंमलदार गणेश पालवे, राजेश राठोड, किशोर जाधव यांचा पथकाने केली.




