Friday, May 3, 2024
Homeनाशिकआकाशातील ग्रहांची युती पाहण्याची दुर्मिळ संधी; अशी साधा पर्वणी

आकाशातील ग्रहांची युती पाहण्याची दुर्मिळ संधी; अशी साधा पर्वणी

Photo : Gaurav Deshpande 

नाशिक | प्रतिनिधी 

- Advertisement -

कोरोनाचे सावट आपल्या सगळ्यांवर आहे. यामध्ये आकाशासारखी मुक्त व मोफत प्रयोगशाळा मिळाली आहे. त्याचा लाभ घेऊया. अर्थातच सर्व काळजी घेऊन, घराच्या बाल्कनीमधून किंवा टेरेसवरून पाहुया. सोशल अंतराचे नियम पाळून आकाशात घडत असलेले बदल पाहूया असे आवाहन खगोल अभ्यासक सुजाता बाबर यांनी केले आहे.

त्या म्हणाल्या, सध्या आकाशात पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी साधारण अडीच वाजेपासून चंद्र आणि गुरु, मंगळ आणि शनी या ग्रहांची युती पूर्व आकाशात धनु आणि मकर राशींच्यामध्ये एका ओळीत दिसून येते.  हे दृश्य १६ एप्रिलच्या पहाटेपर्यंत दिसणार असून याचा नागरिकांनी घरात बसून आनंद घ्यावा.

अर्थातच या सगळ्या ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा सर्वात तेजस्वी म्हणजे शनी व मंगळ ग्रहांपेक्षा १४ पट तेजस्वी दिसतो. शनी आणि मंगळ देखील अत्यंत तेजस्वी दिसत आहेत. सर्वात वर गुरु, खाली शनी आणि नंतर मंगळ असे हे ग्रह दिसत आहेत. हे दृश्य रात्री अडीच ते पहाटे सूर्योदयापर्यंत दिसू शकेल.

दुर्बिणीतून तसेच दूरदर्शीमधून हे दृश्य आपण पाहू शकता. दुर्बिणीमधून आणि दूरदर्शीमधून गुरुच्या चार गॅलीलीयन उपग्रहांचे, म्हणजेच आयो, युरोपा गॅनिमिड आणि कॅलिस्टो यांचेदेखील दर्शन होईल.

सूर्याच्या पाठोपाठ बुधदेखील उगवतोय. परंतु तो लहान असल्याने व सूर्याच्या तेजामुळे दिसू शकणार नाही. शिवाय सायंकाळी सायंतारा म्हणून प्रसिद्ध असलेला शुक्र ग्रह देखील पहायला मिळतो आहे.

त्यामुळे एका रात्रीत पाच ग्रहांचे दर्शन हा सुंदर योगायोग म्हणता येईल. अशीच युती ज्यांना काही कारणामुळे पाहायला मिळाली नसेल त्यांना पुन्हा हे दृश्य मे महिन्यामधेही दिसेल. पुन्हा अशीच युती आपण १२ मे ते १६ मे पहाटे अडीचच्या सुमारास दिसू लागेल ती सूर्योदयापर्यंत आकाशात पाहू शकाल. हे दृश्य धनु, मकर आणि कुंभ अशा तीन तारकासमुहांमध्ये विखुरलेले दिसेल. तेव्हा घरात बसून अंतराळातील या अनोख्या तसेच डोळे दिपवून टाकणाऱ्या घटना नक्की बघा असे आवाहन सुजाता बाबर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या