दहिवड | वार्ताहर Dahivad
कांदा भावात होणार्या सततच्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी आज देवळा तालुयातील खारीफाटा येथे ट्रॅक्टरमध्ये भरलेला कांदा रस्त्यावर ओतत शासनाचा निषेध करत रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राज्यमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, नायब तहसीलदार अहिरराव तसेच पोलीस अधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देत संतप्त शेतकर्यांच्या भावना समजून घेतल्या. उपस्थित केलेल्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन अधिकार्यांतर्फे देण्यात आल्यानंतर दोन तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.
उन्हाळ कांद्याला मिळत असलेल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च देखील निघणे दुरापास्त झाले आहे. अशातच वातावरणातील बदलामुळे चाळीत भाव वाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा सडू लागला असल्याने उत्पादकांवर दुहेरी संकट ओढवले आहे. कर्ज व हात उसनवार करत कांद्याची लागवड केली होती. मिळत असलेल्या भावामुळे कर्ज फेडणे अशक्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या आर्थिक विवंचनेमुळे शेतकर्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
आज खारीफाटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये सुरू झालेल्या कांदा लिलावात कांद्याला सरासरी ८०० ते ९०० रुपयांचा बाजार भाव मिळाला. चांगल्या कांद्यास अत्यल्प भाव मिळाल्याने उपस्थित शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. यावेळी बाजार समितीत उपस्थित असलेल्या सर्व शेतकर्यांनी एकत्र येत सौंदाणे ते वघई या राज्य मार्गावर ट्रॅक्टरमध्ये भरलेला कांदा टाकून राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडून रास्तारोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी देखील मोठ्या संख्येने रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते.
कांद्याचे भाव दिवसेगणिक कमी होत असल्याने उत्पादक अक्षरश: हवालदिल झाले असल्याने राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने कांद्या भावावर योग्य तोडगा काढून शेतकर्याची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी रास्ता रोको आंदोलन करणार्या शेतकर्यांतर्फे केली गेली. शेतकर्यांनी राज्य मार्गावरच ठाण मांडल्याने दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार अहिरराव व पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिल्यानंतरच शेतकर्यांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले.
दोन तास वाहतूककोंडी
लिलावादरम्यान अत्यल्प भाव कांद्यास मिळत असल्याचे पाहत संतप्त शेतकर्यांनी रस्त्यावर कांदा ओतत रास्तारोको आंदोलन प्रारंभ केला. संतप्त शेतकरी रस्त्यावरच बसल्याने सौंदाणे फाटा ते खारीफाटा दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास दोन तास हे आंदोलन सुरू असल्याने वाहतूक ठप्प होती. आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी परिश्रम घेतले.




