अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात पात्र, अपात्र रेशनकार्ड शोधण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत त्यात्या ठिकाणच्या गेल्या वर्षभराचे वास्तव्याचे पुरावे सादर न करणार्या नागरिकांचे रेशनकार्ड रद्द करण्याचेे आदेश राज्याच्या अन्न-नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 31 मेपर्यंत ही तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या काळात स्थानिक पुरवठा विभागाचे कर्मचारी रेशन कार्डधारकांच्या घरीही भेट देत खात्री करणार आहेत. नगर जिल्ह्यात ही तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यातील प्रत्येक रेशनकार्डची तपासणी होणार आहे. यासाठी रेशनकार्डधारकांना त्यांच्या रेशन धान्य दुकानदारांकडून तपासणी नमुना फॉर्म विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. तो फॉर्म भरून गेल्या वर्षभरातील वास्तव्याच्या पुराव्यासह दहा प्रकारातील पुरावे संबंधित रेशनधारकाला सादर करावे लागणार आहेत. अन्यथा त्यांचे रेशनकार्ड अपात्र ठरणार आहे. यासह संबंधित रेशनकार्डधारकांना हमीपत्रही द्यावे लागणार आहे. हमीपत्रासह फॉर्म दुकानदारांकडे सादर केल्यानंतर ग्राहकाला त्याची पोहच मिळणार आहे. पुरवठा विभागाकडून होणार्या छाननीत वास्तव्याचा पुरावा आणि योजनेच्या निकषानुसार सर्व कागदपत्रे असलेल्या अर्जांचा गट ‘अ’मध्ये आणि कागदपत्रे नसलेल्या अर्जांचा गट ‘ब’च्या यादीत समावेश केला जाणार आहे.
अ यादीतील रेशनकार्ड सादर केलेल्या कागदपत्राला अनुसरून योग्य त्या वर्गवारीत (अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी आदी) पूर्ववत ठेवण्यात येणार आहे; तर ब यादीतील कार्डधारकांना 15 दिवसांच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर करण्यास मुदत दिली जाणार आहे. मुदतीत पुरावे सादर न केल्यास आणखी 15 दिवसांची मुदत दिली जाईल. या काळातही पुरावे न दिल्यास रेशनकार्ड निलंबीत केले जाणार आहे. ही मोहिम नगर जिल्ह्यात राबवण्यात येणार असून त्यादृष्टीने तालुका पातळीवर सुचना देण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
यापूर्वी 2021 मध्ये तपासणीचे आदेश
राज्यात यापूर्वी 2021 मध्ये रेशनकार्डची तपासणी मोहिम करण्याचे शासन आदेश काढण्यात आले होते. मात्र, आदेश काढण्यापलिकडे काहीच काम झाले नाही. यामुळे त्यावेळी रेशनकार्डची तपासणी झाली नव्हती. आता मयत, स्थालांतरी आणि परदेशात स्थायिक झालेल्या नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी रेशनकार्ड तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हे पुरावे जोडावे लागणार
रेशनकार्डधारक त्या भागात राहत असल्याबाबत भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, गॅस जोडणी क्रमांकाबाबत पावती, बँक पासबुक, वीज बिल, टेलिफोन, मोबाईल बिल, ड्रायव्हिंग लायसेन्स, ओळखपत्र (कार्यालयीन), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी एक पुरावा द्यावा लागणार आहे. हा पुरावा एक वर्ष कालावधीपेक्षा जुना नसावा.
अधिकारी, कर्मचार्यांचे केशरी रेशन कार्ड रद्द होणार
शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील, खासगी कंपन्यांतील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचार्यांकडे पिवळी, केशरी शिधापत्रिका असेल, तर ती शिधापत्रिका तत्काळ रद्द केली जाणार आहे. त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य शिधापत्रिका दिली जाणार आहे.
एकाच कुटुंबात, एकाच पत्त्यावर दोन कार्ड नाही
रेशनकार्डची तपासणी करताना, एका कुटुंबात व एकाच पत्त्यावर दोन रेशन कार्ड दिली जाणार नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास त्याची खातरजमा संबंधित अधिकार्यांनी केली पाहिजे. संशयास्पद रेशन कार्डच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. विदेशी नागरिकांना रेशनकार्ड दिले जाणार नाही.