श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
राज्य आणि केंद्र सरकार गरजू अंत्योदय आणि प्राधान्य लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ प्रति लाभार्थी पाच किलो धान्य मोफत देते. त्यासाठी पुरवठा खाते नियंत्रण आणि वितरण व्यवस्था पाहते. मात्र, चालू महिन्यांत या योजनेतील लाभार्थ्यांना किडलेले गहू, तांदूळ आणि ज्वारीचे वाटप सुरू आहे. या भेसळयुक्त धान्याला कुबट वास असून यामुळे लाभार्थ्यांना हे धान्य कोंबड्या बकर्यांना चारण्याची वेळ आली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात 43 हजार 791 प्राधान्य आणि अंत्योदयचे 8 हजार 624 कुटुंब आहेत. या योजनेत दोन लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना 125 स्वस्त धान्य दुकानांमार्फत मोफत धान्यांचा पुरवठा करण्यात येतो. यात तांदूळ आणि ज्वारी असे प्रति लाभार्थी पाच किलो धान्य वितरण केले जाते. यासाठी दर महिन्याला 1 हजार 100 टन धान्य पुरवठा विभागाकडून तालुका पातळीवर उपलब्ध होते. या धान्याच्या एका गोणीत 50 किलो 500 ग्रॅम धान्य असून या धान्यांची गुणवत्ता व पोषकता तपासणीची जबाबदारी ही पुरवठा विभागाची आहे.
यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी, तालुका स्तरावर पुरवठा निरीक्षक, गोडाऊन किपर यांच्या नियुक्त्या आहेत. मात्र, असे असतांना तालुक्यात सध्या लाभार्थ्यांना किडके, भेसळयुक्त धान्याचा पुरवठा होताना दिसत आहे. या धारणातील गहू व ज्वारीला किडे आलेले आहेत. याबाबत दुकानदारांना विचारले असता, जसा माल आला, तसा वितरित करत असल्याची प्रतिक्रिया दिली.
पुरवठा विभागाकडून दखल नाही – हिरडे
स्वतः धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीशराव हिरडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, लाभार्थ्यांना खराब माल देतांना दुकानदाराला सामोरे जावे लागते. लाभार्थ्यांच्याबरोबर वाद होतात. प्रशासन ऐनवेळी हात वर करते. आम्ही पुरवठा विभागाला आणि दुकानदाराला माल पुरवठा होताना चांगल धान्य देण्याची मागणी केली आहे. परंतू याकडे प्रशासन दुर्लक्ष असल्याचे हिरडे म्हणाले.




