Friday, November 22, 2024
Homeब्लॉगरविना

रविना

जुलै महिना होता. जूनमध्ये शाळा सुरू होऊनही रविना शाळेत आली नव्हती. घरी फोन केल्यावर आज येईल, उद्या येईल असेच उत्तर यायचे. आठ दिवसांपूर्वी स्वयंपाकी दादांना घेऊन रविना राहते त्या पाड्यावर जाऊन आले होते. अथक प्रयत्न केल्यावर रविना शाळेत आली होती. यंदा ती दुसर्‍या इयत्तेमध्ये गेली होती. मी शाळेतच राहत होते. माझ्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. रविना दाराशी येऊन उभी राहिली.

मी : काय गं, काय झालं?

रविना : (रडतच) माज्या घरी जायाच हाये

- Advertisement -

मी : अरे बापरे, पण तू आताच आलीस ना काल, कसे जाता येईल पुन्हा घरी?

रविना : राहिले की दोन दिस.. आता जाऊदे मला.

मी : हे बघ बाळा, पहिलीला असताना पण तू असेच केले होतेस. सारखे घरी जाशील तर मोठी कशी होशील? अभ्यास मागे राहून जातो ना.

रविना : (अगदीच रडकुंडी स्वरात) पन मला जायाच हाये तूमी फोन लावून द्ये पप्पाला त्येला बोलावं हिकडं.

मी : फोन लावून देते मी.. बोल तू.. पण इकडे बोलवायचे नाही. ते इकडे आले म्हणजे तू लगेचच घरी जायला निघते.

रविना : मला जायाचं हाये. तू पाठव नाहीतर तुला दगुड मारेन.

मी : मला दगड लागला तर रक्त येईल ना, आणि दवाखान्यात तू नेशील का मग मला?

रविना : (चिडून) नाय जा मर तू मला घरी जाऊ देत न्हाय तू.

पाय आपटत रविना निघून गेली. दरवेळी तिचे आई-वडील तिला भेटायला आले की रडून रडून ही सगळी शाळा डोक्यावर घ्यायची. त्यांच्या गाडीमागे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पळत जायची. तिला पकडून आणावे लागायचे. उगाचच पोरगी शाळेबाहेर पळून जाईल. लहान आहे, घर नाही सापडले तर हरवेल म्हणून. पण यावर्षी तसेच व्हायला नको म्हणून मी तिला विरोध करत होते. रविना रागात निघून गेली खरे, पण रडत बसली असेल असे मला वाटत होते.

मी तिच्या खोलीकडे गेले. तिच्या खोलीतल्या मुली शाळेत जायची तयारी करत होत्या. रविना मात्र भिंतीवर स्केचपेनने काहीतरी रेखाटन करत होती. मी रविनाला आवाज दिला तसे ती तोंड वळवून दुसर्‍या भिंतीवर चित्र काढू लागली. मी पुन्हा तिच्या जवळ गेले आणि म्हणाले,

फोन लावायचा होता ना? तू मला नंबर दिलाच नाहीस तुझ्या पप्पांचा

रविना : नाटक नक करू.. तुज्याकडे हाये नंबर. मागल्या वरसाला मी रडाया लागले की करायचे तुम्ही फोन

मी : पण आता फोन बदलला गं. तूच सांग नंबर. आता नाहीये माझ्याकडे.

रविना : खोटं.

मी : नाही गं, सांग बरे नंबर.

रविना : माज्या आधारकार्डचं फोटो हाये. तू घेतला व्हतास. त्यावर हाये माझ्या पप्पाचा नंबर.

मी फक्त गालात हसले. तिच्या वडिलांना फोन लावला होता पण सुमारे नंतरचे दोन तास तो फोन नॉट रिचेबल होता. दरम्यान, चार-पाच वेळा रविना माझ्याकडे येऊन गेली होती. मी वारंवार सांगत होते की फोन लागत नाहीये. पाचव्या वेळेस रविना आली. तिचे हात मागे होते. डोळे पूर्ण डबडबलेले होते. माझ्यासमोर येऊन मान खाली घालून ती उभी राहिली.

मी तिला म्हणाले, हे बघ बाळा मगापासून फोन लावतेय. लागत नाहीये फोन.

माझ्या हातातल्या फोनकडे न बघता, रविनाने तिच्या हातात मागे लपवून ठेवलेली बांगडीची काच जोरात माझ्या हातावर मारली. माझ्या हातातून रक्त यायला लागले. मी हातावर रुमाल टाकणार तेवढ्यात रविना मला बिलगली. हातातून रक्त वाहतेय हे बघून वर्गातली बाकी मुले भोवती गोळा झाली. एका मुलाने जाऊन शेजारच्या वर्गातल्या सरांना बोलावून आणले. सरांनी आल्यावर मुलांनी सर्व घटना सांगितली. सर तिला रागवत होते. पण रविना मला अजूनही बिलगून होती. मी सरांना थांबवले. वर्गातल्या मुलांनी स्वयंपाकखोलीतून आणलेली हळद माझ्या हातावर टाकली.

मी : रविना, काय झालेय? असे कोणी वागते का? स्वतःच मला काच मारलीस आणि पुन्हा मला बिलगून रडतेस..

रविना : मला घरी सोडून दे.. घरी जायचं आहे.

मी : बघू, पण असे चुकीचे आहे ना बाळा.

रविना : तुमी फोन लावला न्हाई.. खोटं बोलत्यात.

मी : नाही गं.. हे बघ फोन लावला पण लागत नाहीये.

रविना हे सर्व समजण्यापलीकडे होती. तिला असे वाटत होते की मी खोटे सांगतेय आणि फोन लावत नाही. तितक्यात तिकडून तिच्या वडिलांचा फोन आला.

मी फोन रविनाकडे दिला. रडतच रविना फोनवर बोलत होती. तिने तिच्या आई-वडिलांना भेटायला बोलावले. मला आश्चर्य वाटत होते, एवढा वेळ घरी जायचे म्हणून गोंधळ घालणारी रविना अचानक फक्त भेटण्यासाठी आई-वडिलांना का बोलावेल?

फोन ठेवताक्षणी मी तिला विचारले, कधी जायचे घरी? केव्हा येताय तुझे मम्मी आणि पप्पा?

रविना : उद्या भेटाया येणारे

मी : घरी नाही जायचे तुला? सकाळपासून तर एवढा गोंधळ घातलास तू..

रविना : न्हाई. आता मी तुमच्या संग राहणार.. तुमच्या खोलीमधे.

मी : का गं?

रविना : तुमाला म्या काच चोचली (टोचली) रगत आलाय. पर काय बी उराळले (ओरडले ) नै.

माझं चुकलं, शॉरी

मी रविनाला जवळ घेतले. नंतर बराच वेळ माझ्या हातावर लावलेल्या हळदीकडे ती बघत बसली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या