नवी दिल्ली – New Delhi
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमी चर्चेत असतो. पाकिस्तानच्या संघाबाबतही तो बेधडकपणे मते मांडत असतो. त्यामुळे त्याचे विषय हे नेहमी ‘ट्रेंडिग’ असतात. आता त्याच्याविषयी…
एक मोठी बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार, देशातील क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने शोएबशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. त्यानुसार, शोएब अख्तर पाकिस्तान संघाचा मुख्य निवडकर्ता होऊ शकतो.
सध्या हे पद मिसबाह-उल-हककडे आहे. शिवाय त्याच्याकडे संघाचे मुख्य प्रशिक्षकपदही आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौर्यात पाकिस्तान संघाची कामगिरी खराब झाली. त्यामुळे पाक क्रिकेट बोर्ड मिसबाहची निवड समिती प्रमुख पदावरुन उचलबांगडी करण्याच्या तयारीत आहे.
या वृत्तामुळे ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ नावाने ओळख असलेला शोएब अख्तर पुन्हा एकदा मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. तो म्हणाला, मी या गोष्टीला नाकारणार नाही. हो, मी बोर्डाशी चर्चा केली आहे आणि मला पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी भूमिका निभावण्यात रस आहे. परंतु अद्याप काहीही निश्चित झाले नाही.
मी खूप आरामदायक आयुष्य जगतो. मी स्वत:च्या अटींनुसार क्रिकेट खेळलो आहे, पण आता मी ही विश्रांती सोडण्यास तयार आहे आणि पीसीबीबरोबर काम करण्याची नेहमीच अपेक्षा करतो. मी इतरांच्या सल्ल्यांना घाबरत नाही. जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच वेळ देईन.
मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हकच्या खांद्यावर मुख्य निवडकर्ता पदाचे ओझे कमी करण्याची पीसीबीची योजना आहे. पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या वृत्ताचा तपशील देण्यास नकार दिला आहे.