मुंबई | Mumbai
गेल्या दोन दिवसांपासून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि संचालकांची मासिक पतधोरण ठरविण्यासाठी बैठक सुरु होती. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समिती (MPC) बैठकीचे निकाल जाहीर झाले आहे. त्यानुसार रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे सध्याच्या ईएमआय रकमेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट जैसे थे ठेवल्याने गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात आणि हप्त्यात कोणताही बदल होणार नाही. यापूर्वी जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांची कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट सहा टक्क्यांवरुन ५.५० टक्क्यांपर्यंत खाली आला होता.
रेपो रेट ‘जैसे थे’
सध्या रेपो रेट ५.५० टक्के इतका आहे. गेल्या सलग तीन बैठकीत आरबीआयने त्यात कपात केली होती. मात्र, यावेळी रेपो दर स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट हा असा व्याजदर असतो, ज्यावर रिझर्व्ह बँक देशातील बँकांना कर्ज देते. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा बँकांना कमी दरात निधी उपलब्ध होतो. त्यामुळे त्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी करतात. परिणामी, गृहकर्ज, कार लोन किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्तेही कमी होतात. म्हणूनच रेपो रेटमध्ये होणारे बदल सर्वसामान्य ग्राहकांच्या ईएमआयवर थेट परिणाम घडवतात.




