अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मारेकर्यांना न्यायालयात ओळखण्यास नकार दिल्याने सरकार पक्षाने एवढ्या मुद्यापुरते फितूर घोषित केलेल्या साक्षीदार विजयमाला माने यांची उलटतपासणी आज (शुक्रवार) न्यायालयात होणार आहे. या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. रेखा जरे खून खटल्याची न्यायालयीन सुनावणी सध्या सुरू आहे. जरे यांच्या खुनाची घटना प्रत्यक्ष पाहणार्या तत्कालीन महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने यांची साक्ष मागील मंगळवारी (12 नोव्हेंबर) नोंदवण्यात आली. यावेळी जरे यांच्या मारेकर्यांना ओळखण्यास त्यांनी नकार दिला.
त्यामुळे या मुद्यापुरते त्यांना फितूर (होस्टाईल) घोषित करून त्यांची उलट तपासणी सरकार पक्षातर्फे सुरू करण्यात आली. ही सुनावणी आता आज होणार असल्याने आधी माने यांची उलटतपासणी सरकार पक्ष घेईल व त्यानंतर फिर्यादीचे वकील तसेच संशयित आरोपींचे वकील त्यांची उलट तपासणी घेणार आहेत. सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांच्यासमोर सुरू आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. अनिल ढगे, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. सुरेश लगड हे काम पाहत आहेत. तर संशयित आरोपीतर्फे अॅड. महेश तवले व अॅड. परिमल फळे हे काम पाहत आहेत. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी तपासी अधिकारी यांनी एकंदरित 68 साक्षीदारांचे जबाब नोंदविलेले आहे.या खटल्यात आत्तापर्यंत जवळपास 27 साक्षीदार सरकारपक्षातर्फे तपासण्यात आले.