मालेगाव | प्रतिनिधी
येथील सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नुकताच भरती झालेला रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांचा राग अनावर झाल्याने अतिदक्षता विभागात तोडफोड केल्याची घटना घडली. यावेळी ऑक्सिजन सिलेंडर एकाने उचलून आदळले. यात डॉ. फराह नामक महिला वैद्यकीय अधिकारी बालंबाल बचावल्या आहेत. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता, तर संरक्षण न मिळत असल्यामूळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, पोलीस उपअधीक्षकांनी पुरेश बंदोबस्त वाढविण्याबात आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले व रुग्णांवर उपचार करणे सुरु झाले आहे.
आज दुपारी साडेतीनच्या सुमारास श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे इस्लामपुरा भागातील एक ४५ वर्षीय रुग्णाला अतिशय गंभीर अवस्थेत त्याचे नातेवाईक दवाखान्यात घेऊन आले होते. दरम्यान, या रुग्णावर ताबडतोब अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. कोरोना विषाणूचे लक्षणं दिसून आल्यामुळे या रुग्णाला आयसोलेशन वार्डमध्ये शिफ्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या.
यानंतर लगेचच या रुग्णाला शिफ्ट करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. मात्र, आयसोलेशन वार्ड मध्ये शिफ्ट करण्याच्या प्रक्रियेदरम्यानच या रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्ण दगावल्याचा राग अनावर झाल्यामुळे रुग्णाच्या नातलगांनी प्रचंड गोंधळ रुग्णालयात घातला.
यादरम्यान, एका नातलगाने ऑक्सिजनचे सिलेंडर उचलून जमिनीवर आदळले. यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. तर याच वार्डमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या फराह नामक डॉक्टर बालंबाल बचावल्या. यानंतर भयभीत झालेल्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय काम सुरु करणार नाही असा पवित्र्या या कर्मचाऱ्यांनी घेतला होता.
यानंतर मालेगावचे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले याठिकाणी दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पोलीस यंत्रणा रुग्णालयात तैनात असल्याचे आश्वासन देऊन पुढे हे प्रकार होणार नाहीत याबाबत काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. यानंतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील कामकाजाला सुरुवात केली.