अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पंढरपूरचा विकास आराखडा सादर करण्याचे भाग्य मला मिळाले होते. आता नेवाशातील ज्ञानेश्वर सृष्टीचा 850 कोटी रुपयांचा आराखड्यावर संत, महंत यांच्या सूचना विचारात घेऊन परिपूर्ण आराखडा तयार करण्यात येणार आहे. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी दारूची दुकाने, मासांहाराची दुकाने हटविण्यासोबत तेथील अतिक्रमणे काढण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. धार्मिक स्थळाचे पावित्र टिकून राहिले पाहिजे, याबाबत दुमत नाही. मात्र, अतिक्रमणे काढताना संबंधित अतिक्रमणधारकांचे पुर्नवसन होणे गरजेचे आहे. प्रपंच उद्ध्वस्त करून सुशोभिकरण करायचे नाही, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नेवाशातील प्रस्तावित ज्ञानेश्वर सृष्टीच्या आराखड्यावर जिल्ह्यातील संत, महंत आणि धार्मिक क्षेत्रात काम करणार्यांच्या बैठकीनंतर नगरमध्ये शनिवारी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. तत्पूर्वी नगरच्या सहकार सभागृहात जिल्ह्यातील संत आणि महंतांनी प्रस्तावित ज्ञानेश्वर सृष्टी आराखड्याचे सादरीकरण पाहून त्यावर विविध सूचना केल्या. यातील काही सूचनांचा आधार घेत पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, धार्मिक ठिकाणी असणारी दारूची दुकाने आणि मासांहाराची दुकाने काढण्यासोबत याठिकाणी असणारी अतिक्रमणे काढण्याच्या सूचना धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींकडून आल्या आहेत. या सूचना योग्य असून त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
धार्मिक ठिकाणांचे पावित्र्य टिकले पाहिजे. तसेच तेथे असणारे अतिक्रमणे निघाली पाहिजेत. मात्र, हे करताना अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. कोणाचे प्रपंच उद्ध्वस्त करून सुशोभिकरण करावयाचे नाही. समाजातील प्रत्येक घटकाला या प्रक्रियेत सामावून घ्यायचे आहे. सोलापूरचा पालकमंत्री असल्याने पंढरपूरचा 21 कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे भाग्य मला मिळाले. आता ज्ञानेश्वर सृष्टीचा 850 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यावर आलेल्या सूचनांचा अंर्तभाव करून राज्य सरकारला परिपूर्ण आराखडा सादर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. वाराणसी येथील मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवल्याच्या घटनेचा निषेध केलेला आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवलेले आहे. हा विषय आता क्षमला असला तरी कोणत्याही धार्मिक स्थळातील मूर्ती काढल्या जाऊ नयेत, अशी अपेक्षा ना. विखे पाटील यांनी व्यक्त केली.
शहर आणि जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर
नगर शहर आणि जिल्ह्याचे नामांतर आता अहिल्यानगर करण्यात आलेले आहे. नामांतर झाले असले तरी त्यासाठी असणार्या प्रक्रिया सुरू असून लवकरच महसूल विभागाकडून स्वतंत्र राजपत्र प्रकाशित होईल व त्याद्वारे अहमदनगर शहर, अहमदनगर तालुका व अहमदनगर जिल्हा यांचे नाव अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महसूल संहितेचा हा भाग असून नगर शहर आणि जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामांतर झाले असल्याचे महसूल मंत्री ना. विखे पाटील यांनी सांगितले.
ठाकरे यांचे विश्वासघाताचे राजकारण
भाजपवर टीका करणारे उध्दव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष असून ज्येष्ठ नेते आहेत. तसेच मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. युती म्हणून निवडणूक एकत्र लढवत विश्वासघाताचे राजकारण करत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम ठाकरे यांनी केले असल्याची टीका ना. विखे यांनी केली.