नवी दिल्ली | प्रतिनिधी Nashik
रेल्वेतून निवृत्त झालेल्यांना पुन्हा रेल्वेत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. त्याबाबत भारतीय रेल्वे बोर्डाने परिपत्रक जारी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेतला आहे.
रेल्वे बोर्डाने विविध क्षेत्रातील २५,००० पदांसाठी भरती सुरू केली आहे. यात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करून रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे. या अंतर्गत ६५ वर्षांखालील सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षकांपासून ट्रॅक पुरुषांपर्यंतच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करता येतील.
या आहेत नियम व अटी
कर्मचारी ज्या वेतन स्तरावर सेवानिवृत्त झाले आहेत त्याच वेतन स्तरावर त्यांना पुनर्नियुक्त करण्यात येईल. पुनर्नियुक्तीचा निर्णय फक्त महाव्यवस्थापकांचा असतो. कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय फिटनेस चाचणी केली जाईल.
याशिवाय, या कर्मचाऱ्यांना नोकरीच्या कालावधीत कोणतीही वेतनवाढ दिली जाणार नाही किंवा एचआरए किंवा डीएचा लाभही दिला जाणार नाही. या कर्मचाऱ्यांना दरमहा पगारासह दीड दिवसांची रजाही मिळणार आहे. कराराची मुदत संपल्यावर कोणतीही सशुल्क रजा शिल्लक राहिल्यास, त्यासाठी वेगळे पेमेंट केले जाणार नाही.
भारतीय रेल्वेने जारी केलेल्या परिपत्रकात रेल्वेतील कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या दिल्या जातील, असे म्हटले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक झोनच्या महाव्यवस्थापकांना असेल.
नोकरीची वर्षे किती असतील ?
कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या कमतरतेमुळे भारतीय रेल्वेचे मोठे नुकसान होत असल्याचे हे परिपत्रक सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी देण्यात येणार आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना दोन वर्षांसाठी किंवा ६५वर्षे वयापर्यंत, यापैकी जे आधी असेल ते कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्यात येतील.