मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचे लग्न निश्चित झाले आहे. नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी रेवती सुळे यांचा विवाह होणार आहे. या आनंदाच्या बातमीमुळे पवार आणि सुळे कुटुंबियांवर सध्या राजकीय आणि सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. स्मृती शिंदे यांनी रेवती आणि सारंग यांचा एकत्र फोटो पोस्ट करत या जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचेही अभिनंदन केले. रेवती यांचा भाऊ विजय सुळे यानेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या बातमीला दुजोरा देत बहिणीचे अभिनंदन केले आहे.
रेवती सुळे यांचे होणारे पती सारंग लखानी हे नागपूरचे रहिवासी आहेत. ते नागपुरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि ‘विश्वराज ग्रुप’चे अध्यक्ष अरुण लखानी यांचे चिरंजीव आहेत. सारंग हे केवळ एक यशस्वी उद्योजकच नसून ते एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत. सारंग यांच्याशी विवाह निश्चित झाल्यामुळे रेवती सुळे आता नागपूरच्या सूनबाई होणार आहेत.
या विवाहाची विशेष चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, कारण हे लग्न ठरवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार आणि लखानी कुटुंबाला एकत्र आणण्यात या दोन्ही नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते.
खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या असलेल्या रेवती यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून आपली पदवी पूर्ण केली आहे. त्या सहसा प्रसिद्धीझोतात राहणे टाळतात; मात्र गेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या आईच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या साधेपणाचे आणि उच्च शिक्षणाचे नेहमीच कौतुक केले जाते.





