नाशिक | प्रतिनिधी Nashik
शिक्षकांचा सन्मान होणे ही अतिशय चांगली बाब आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण हे सुप्त रूपात असते. शिक्षण ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त शक्तीचे अथवा गुणांचे प्रकटीकरण करण्याची प्रेरणा देतो तो म्हणजे शिक्षक. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत-लेखक रावसाहेब कसबे यांनी केले. दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गुरु सन्मान पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. नाशिक-पुणे रोडवरील नाशिक्लब येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक शिक्षक व शैक्षणिक संस्था सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या सेवाकार्याचा गौरव आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दैनिक देशदूतकडून शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून ‘गुरू सन्मान पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पाच शिक्षकांना विशेष सन्मान तर बारा शिक्षकांना रावसाहेब कसबे यांना ‘गुरु सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांसह ‘देशदूत’चे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे उपस्थित होते.
रावसाहेब कसबे यांनी सुरुवातीला दिवंगत देवकिसन सारडा यांच्या आठवणींना उजाळा दिला. हल्ली शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. शिक्षक होणे म्हणजे जोखीम उचलणे असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यासाठी तयार केल्यामुळे ते त्यांचे विचार प्रभावीपणे मांडू शकतील. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ करणे आणि त्यांचे ज्ञान प्रभावीपणे प्रदर्शित करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे हे शिक्षकांचे महत्वाचे कार्य आहे. जे वाचतील समजून घेतील समाजाला पुढे नेतील, असे शिक्षक आपण निर्माण व्हावे. फुले, शाहू, आंबेडकरांनी बहुजन समाजात शिक्षणाची पायाभरणी केली. शिक्षणाचा अर्थ त्यांनी समाजाला सांगितल्याचे कसबे म्हणाले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना अॅॅड. नितीन ठाकरे म्हणाले की, शिक्षकाने नेहमी सर्जनशील असले पाहिजे. शिक्षकाच्या अंगी नेहमी नवे काही शिकण्याची उमेद असली पाहिजे तरच तो शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून टिकू शकतो. सध्या नवीन शैक्षणिक धोरण हे माध्यमिक स्तरावर लागू झाले आहे. हळूहळू प्राथमिक स्तरावर देखील ते लागू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने अपडेट राहणे गरजेचे आहे. शिक्षकांना सतत त्यांची उपयुक्तता सिद्ध करावी लागणार असल्याने शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे.
सुरुवातीला शैलेंद्र तनपुरे यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्यावतीने सन्मानाला उत्तर देताना अरुण महाजन, रावसाहेब म्हस्के आणि महेंद्र शेवाळे यांनी उत्तर देताना या ठिकाणी झालेल्या सन्मानामुळे अधिकाधिक उत्तम कार्य करण्याची ऊर्जा मिळाली असून देशदूतने केलेला सन्मान हा अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅॅड. वैभव शेटे, नावाचे गणेश नाफडे, राजेश शेळके, सुनील महामुनी, दीपक जगताप, सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (शहर) मिलिंद वैद्य, सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी, कॉर्पोरेट सहायक महाव्यवस्थापक संदीप राऊत, वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक, मुख्य बातमीदार रवींद्र केडीया, किशोर चौधरी, मार्केटिंग ऑफिसर समीर पराशरे, भगवान जाधव, आनंद कदम, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास पाटील, विवेक वाणी, नितीन गांगुर्डे, संतोष गिरी, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे यांनी मेहनत घेतली.
विशेष सन्मान पुरस्कार
जयश्री भास्कर वाकचौरे
किरण देवीदास वाघमारे
प्रमोद बसप्पा हिंगमिरे
बाबासाहेब नागनाथ बेरगळ
बाळासाहेब गंगाधर थोरात
गुरु सन्मान पुरस्कार
अरूण महाजन
सुभाष देशमुख
प्रकाश कोल्हे
रावसाहेब म्हस्के
विलास निकुंभ
कल्याण नेहरकर
गणेश पिंगळे
महेंद्र शेवाळे
सुनील चौघुले
भीमाशंकर ग्रामोदय संस्था
ज्ञानदीप शिक्षण संस्था,
बालभारती पब्लिक स्कूल
























































