अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महसूल खात्याच्या विविध विभागातील कर्मचारी, महसूल कर्मचार्यांच्या संप मंगळवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी संप थांबवण्याचे आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकार्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे महसूल संघटनांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
महसूल कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर, राज्य महसूल संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, मुंबई उपनगर जिल्हा महसूल संघटनेचे अध्यक्ष अविनाश सांगाडे आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यानुसार मंगळवारी अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकार्यांशी मंत्रालयात बैठक होऊन चर्चा झाली.
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वच जिल्ह्यातील 15 जुलैपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. 11 जुलैला या कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तर दुसर्या दिवशी लेखणीबंद ठेवून आंदोलन केले होते. मंत्री विखे-पाटील यांनी महसूल कर्मचार्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले. मंत्री विखे पाटील यांच्या अश्वासनानंतर संप मागे घेतल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले.