Friday, November 22, 2024
Homeनगरनवनियुक्त तलाठ्यांनी लोकाभिमुख व पारदर्शकपणे काम करावे

नवनियुक्त तलाठ्यांनी लोकाभिमुख व पारदर्शकपणे काम करावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महसूल विभाग हा सर्वात मोठा विभाग असून या विभागात तलाठी हा महत्वाचा घटक आहे. या विभागाचा सर्व ठिकाणी संबंध आहे. त्यामुळे नियुक्ती देण्यात आलेल्या नवनियुक्त तलाठ्यांनी विभागात लोकाभिमुख व पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार भवन सभागृहात महसूल पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल पंधरवाड्यानिमित्त जिल्ह्यात 189 नवनियुक्त तलाठी यांना महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

महसूल मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले, नवनियुक्त तलाठ्यांनी महसूल विभागात काम करतांना शासनाची प्रतिमा उंचावेल असे काम करावे. जनतेचा विश्वास सार्थ ठरवावा. जनतेला तात्काळ व विनाविलंब सेवा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने त्यांनी काम करावे. असे त्यांनी सांगितले. आमचे शासन गतिमान शासन असून सर्व सामान्यांचे आहे. लोकांना महसूल विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन मिळाल्या पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. महसूल विभागात जमिनीच्या मोजण्या रोअर मशिन प्रणालीमुळे जलदगतीने होत आहेत. मोजणीनंतर ऑनलाईन पध्दतीने नागरीकांना उतारा उपलब्ध होत आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला असून जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध झाली आहे. या डिजीटल युगात नागरीकांना ऑनलाईन पध्दतीने सुलभ सेवा मिळावी या उद्देशाने महसूल विभाग काम करत आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयात सेतू केंद्राच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना सर्व दाखले उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे.

जिल्हाधिकारी सालीमठ यावेळी म्हणाले, महसूल विभागामार्फत जिल्ह्यात जीएम सेवा दूत या ऑनलाईन प्रणालीमार्फत विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यांचा नागरीकांनी लाभ घ्यावा. तसेच जीएम जलदूत या ऑनलाईन प्रणालीतुन टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेमध्ये टँकर मंजूरीपासून ते टँकरच्या शेवटच्या फेरीपर्यंत पारदर्शक पध्दतीने पाणी पुरवठ्याचे काम होणार आहे. यामुळे यातील गैरप्रकार बंद होतील. असे ते म्हणाले. कार्यक्रमात ई-हक्क प्रणाली ई-रेकॉर्ड प्रणालीबाबत सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील नवनियुक्त तलाठी, त्यांचे कुटुंबिय, नागरीक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आभार व्यक्त केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून आतापर्यंत 7 लाख अर्जांची ऑनलाईन नोंदणी झाली असून जवळपास 1 लाख 50 हजार अर्ज मंजूर झाले आहेत. शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना आदी योजनांचा लाभ जास्तीत-जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन ना. विखे यांनी यावेळी केले.

सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्प अंतर्गत मंजूर झालेल्या शहरातील नगर-कोल्हार-शिर्डी रस्त्यावरील डिएसपी चौक उड्डाणपुल, नागापूर एमआयडीसी जवळील सह्याद्री चौक व सनफार्मा चौक या तीन दुपदरी उड्डाणपुलांच्या कामांचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले, जिल्हाधिकारी सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या