संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यावर चांगलेच लक्ष केंद्रीत केले असून आता कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत ‘मिसळ पे’ चर्चा करीत त्यांनी शहरामध्ये सकाळीच येऊन साधलेल्या संवादाची खमंग चर्चा सुरू झाली आहे. मागील आठवड्यात ना. विखे पाटील यांनी सलग तीनवेळा संगमनेर तालुक्याचा दौरा करून तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना सक्रीय होण्याच संदेश देतानाच विखे कुटुंबियांशी अनेक वर्षे जोडल्या गेलेल्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संवादाच्या प्रक्रियेला अधिकच वेग दिला आहे. या संवादाचा एक भाग म्हणूनच ना. विखे पाटील यांनी नवीन नगर मार्गावरील एका हॉटेलात येऊन मिसळ खाण्याचा आनंद घेतला.
निळवंडे येथे जलपूजन आणि पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाला जाताना कार्यकर्ते याच हॉटेलमध्ये एकत्रितपणे मिसळ खाण्यासाठी थांबले असल्याचे ना. विखे पाटील यांना समजले. कार्यकर्त्यांनी त्यांना मिसळ खाण्यासाठी येण्याचा आग्रह केला. त्यानंतर ना. विखे पाटील यांनी आपला वाहनांचा संपूर्ण ताफा या हॉटेलकडे वळवला आणि कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाण्याचा आनंद घेत तालुक्यातील राजकारणाबाबत काही टिप्सही दिल्या. संगमनेरची प्रसिध्द जिलेबी त्यांनी आवर्जून मागून घेतली. ही जिलेबी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचीही आवडीची होती अशी आठवण करून देत दिल्लीमधील अनेक नेत्यांना जिलेबी आवर्जून खाऊ घातल्याचे त्यांनी सांगितले. मिसळ, ताक आणि जिलेबी असा आस्वाद घेत मंत्री विखे पाटील यांनी साधलेल्या संवादाची खमंग चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मागील काही दिवसांत सलग तीनवेळा ना. विखे पाटील यांनी तालुक्यात झंझावती दौरा केला. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही गुंजाळवाडी येथे येऊन विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत सुतोवाच केले. डॉ. सुजय विखे यांनी संगमनेरमधून निवडणूक लढविण्याबाबत व्यक्त केलेल्या भावनांचा निश्चित विचार करून याबाबत महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करण्याबाबत ना. विखे पाटील यांनी केलेली पुष्टी सुध्दा महत्त्वपूर्ण होती. दरम्यान, ना. विखे पाटील यांनी तालुक्यातील काही गावांत तसेच शहरात लावलेली हजेरी आणि कार्यक्रमांना मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी ठरल्याने विखे पाटील कुटुंबियांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात वाढवलेला संपर्क चांगलाच चर्चेचा विषय ठरला असताना आता त्यांच्या ‘मिसळ पे’ चर्चेचा प्रयोग राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरला आहे.