Friday, June 14, 2024
Homeनाशिकउद्यापासून ‘चला जाणूया नदीला’ महोत्सव

उद्यापासून ‘चला जाणूया नदीला’ महोत्सव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

महाराष्ट्रात गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोर्‍यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून (दि.2) ’चला जाणूया नदीला’ महोत्सवाची सुरुवात होणार आहे. वर्धा येथील सेवाग्राममध्ये आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Hydrologist Dr. Rajendra Singh) यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे.

जलबिरादरीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर असतील. देशातील स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. तरुण स्वतः आणि देशवासियांच्या आरोग्यविषयी सजग आहेत. त्यातूनच आपले आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नदीचे आरोग्य ठीक करण्याचा संकल्प तरुणांसोबत महाराष्ट्रातील जनतेने केला आहे. म्हणूनच राज्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी जलबिरादरीकडून समाजाच्या सहभागातून ’चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे महाराष्ट्र जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग यांनी सांगितले.

75 नद्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील नंदिनी, कपिला, वरुणा, वालदेवी, अगस्ती व मोती या नद्यांचा समावेश आहे. राज्याला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी समाजाच्या सहभागाला पाठबळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार सहकार्य करीत आहेत.

2 ऑक्टोबरला वर्धा येथील कार्यक्रमात राज्यातील विविध 75 नद्यांसाठी कार्यरत असलेले 110 जलनायक सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडे डॉ. सिंह, अभिनेते चिन्मय उदगीरकर, मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जलकलश आणि ध्वज सुपूर्द केला जाईल. 15 ऑक्टोबरला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी राज्यातील 75 नद्यांवर एकाच दिवशी नदीयात्रेला सुरुवात होईल. त्यात नदी अभ्यासक, नदीप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, नदीचे स्टेक होल्डर, सरकारी यंत्रणांमधील अधिकारी यांचा सहभाग राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या