Saturday, September 14, 2024
Homeनगररस्त्यावर जनावरे बांधणार्‍यांना नोटिसा

रस्त्यावर जनावरे बांधणार्‍यांना नोटिसा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

गवळीवाडा परिसरात रस्त्यावर गायी – म्हशी सोडणार्‍या, रस्त्यावर गोठा तयार करून जनावरे बांधणार्‍या व अस्वच्छता करणार्‍या जनावरांच्या मालकांना महापालिकेने पुन्हा एकदा नोटिसा बजावल्या आहेत. वारंवार सूचना देऊनही सदरचे गैरकृत्य न थांबल्यास जनावरे, रस्त्यावर ठेवले जाणारे साहित्य जप्त करून महापालिका अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

महापालिकेच्या झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालयाच्या प्रभाग अधिकार्‍यांनी गवळीवाडा येथील तीन रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. गवळीवाडा येथे रहदारीच्या रस्त्यात गायी, म्हशीचा गोठा तयार करण्यात आला आहे. हा रहदारीचा रस्ता असून गर्दीच्या भागात जिल्हा रुग्णालय, शाळा, महाविद्यालय आहे. रस्त्यावरून गायी व म्हशीची ने-आण करणे, रस्त्यात गायी म्हशी उभ्या करणे, गाय म्हशीचे शेण रस्त्यावर पडणे, तसेच रस्त्यावर कडब्याची साठवणूक केली असल्याने या परिसरात अस्वच्छता झाली आहे. तसेच, पाळीव जनावरे असूनही ती रस्त्यावर सोडल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरचे गैरकृत्य थांबवावे. अन्यथा महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, गवळीवाडा परिसरात महापालिकेने यापूर्वीही कारवाई केली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मोकाट जनावरे पकडणार्‍या संस्थेनेही कारवाई केली होती. मात्र, प्रत्येक वेळेस काही ठराविक नगरसेवक कारवाई करणार्‍या पथकातील कर्मचार्‍यांना दमदाटी करून, दबाव आणून जनावरे सोडण्यास भाग पाडतात. त्यामुळे गवळीवाडा व जिल्हा रुग्णालय परिसरातील जनावरांचा प्रश्न कायमच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या