चाकण पोलिसांची कामगिरी; टोळीत राहुरीचे तीन तर पाथर्डीच्या एका आरोपीचा समावेश
राहुरी (प्रतिनिधी) – राज्यमार्गावर एलईडी, वॉशिंग मशीन लुटणार्या 10 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात चाकण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या टोळीत नगर जिल्ह्यातील राहुरीच्या तिघांचा तर पाथर्डीच्या एका आरोपीचा समावेश आहे.
गेल्या 27 नोव्हेबर रोजी रात्री रांजणगाव ता. शिरूर, येथील हायर कंपनीचे वॉशिंग मशीन व एलईडी टीव्ही भिवंडी, मुंबई येथून चाकण-शिक्रापूर रोडने घेऊन जाणार्या कंटेनरला अज्ञात लुटारूंनी टेम्पो आडवा लावला. कंटेनर चालकाचे हातपाय बांधले व तोंडात बोळे कोंबून त्याला निर्जन ठिकाणी नेले. तो कंटेनर खाली करून त्याला मारहाण करून कंटेनर तळेगाव येथे सोडून देण्यात आला होता. याबाबत चाकण पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 1450/2019 भादंवि कलम 395, 120(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची चाकण पोलिसांनी अतिशय शिताफीने उकल केली. या घटनेत कट रचून आरोपी माधव रोहिदास गिते (वय 22, रा. युवराज गुजर यांच्या रूममध्ये भेदणकरवाडी ता. खेड जि. पुणे मुक्काम रा. सोमठाणा ता. कंधार जि. नांदेड), मंगेश काकासाहेब शिंदे (वय 26, रा. खडकी जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), प्रदीप उर्फ ज्योतीराम जालिंदर देशमुख (वय 30, रा. खडकी जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), गणेश शांताराम राक्षे (वय 30, रा. राक्षेवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे), जमराम रामनाथ तनपुरे, कृष्णा उर्फ राहुल एकनाथ धनवटे (रा. राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), संदीप उर्फ अण्णा रावसाहेब धनवटे (वय 43, रा. राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), राजेश महादेव बटुळे (वय 34, ह. रा. किरण येळवंडे यांची खोली, निघोजे, ता. खेड, जि. पुणे, मु. रा. भारजवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) प्रवीण शंकर पवळे (वय 23, रा. राक्षेवाडी, ता. खेड, जि. पुणे), बबुशा उर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर (रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी रस्तालुटीचा कट केला असल्याची गोपनीय खबर सपोनि गायकवाड, पोहेकॉ हिंगे, पोना गायकवाड, पो. शिपाई वर्पे यांना मिळाल्याने त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. यातील बबुशा नाणेकर हा पसार झाला आहे.
अटकेत असलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपींनी या गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल मौजे राक्षेवाडी चाकण येथील निर्जन जंगलात लपवून ठेवला असल्याने या मालाचा शोध घेऊन 33 लाख 65 हजार रुपये किमतीचे वॉशिंग मशीन व एलईडी टीव्ही संच हस्तगत करण्यात आले आहेत.
आरोपींकडे अधिक तपास केला असता यातील आरोपी राजेश महादेव बटुळे (मु.रा. भारजवाडी, ता. पाथर्डी, जि. नगर) याने त्याचे साथीदार विशाल भोसले, नितीन भोसले, अजय उर्फ पप्पू भोसले यांच्या मदतीने मौजे कुरुळी, ता. खेड गावाच्या हद्दीतून एमआरएफ कंपनीचे सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीचे टायर चोरून नेले आहेत. त्याबाबत महाळुंगे पोलीस चौकी (चाकण पोलीस स्टेशन) गुन्हा रजि. नंबर 1141/2019 भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे दाखल असून या गुन्ह्यातील 4 लाख रुपये किंमतीचे 30 ट्रॅक्टरचे टायर जप्त करण्यात आले आहेत.
मौजे सुदुबरे, ता. मावळ, जि. पुणे गावाच्या हद्दीतील महिंद्रा कंपनीच्या पार्किंगमधून एक लाख 80 हजार रुपये किमतीच्या एक्साईड कंपनीच्या बॅटर्या चोरून नेल्या आहेत. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 159/2019 नुसार भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे दाखल असून आरोपींकडून एक लाख 80 हजार रुपये किंमतीच्या बॅटर्या जप्त करण्यात आल्या आहेत. मौजे पॉइंट येथील महाराष्ट्र बँक फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत चाकण पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. 1104/2019 नुसार भा. दं. वि. कलम 457, 380, 511 प्रमाणे दाखल असून या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून एकूण चार गुन्ह्यांतील 46 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप विष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो. नि. कल्याण पवार, सहयक पो. नि. विक्रम गायकवाड, पो. उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोहेकॉ सुरेश हिंगे, पोना संजय जरे, वीरसेन गायकवाड, हनुमंत कांबळे, संदिप सोनवणे, पो. शिपाई निखील वर्पे, प्रदीप राळे, नितीन गुंजाळ, अशोक दिवटे, मनोज साबळे, मच्छिंद्र भांबुरे यांनी केली. गुन्ह्याचा तपास सहायक पो. नि. विक्रम गायकवाड करीत आहेत.