पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नववर्षाच्या पूर्वसंध्येला नेवासा तालुक्यातील पाचेगावफाटा ते लोखंडीफॉल दरम्यान रस्तालुटीच्या दोन घटना घडल्या. एक घटना नेवासा पोलीस ठाणे हद्दीत तर दुसरी श्रीरामपूर हद्दीत घडली. याबाबत माहिती अशी की, चार वाजेच्यादरम्यान एका मोटारसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी श्रीरामपूरहून नेवाशाकडे जात असलेले अगरबत्ती व्यावसायिक अंकुश दिलीप पवार, रा. उंबरे, ता. राहुरी यांची मोटारसायकल थांबवली व मारहाण करुन रोख तीनशे रुपये व रेडमी कंपनीचा मोबाईल चोरून नेला. त्यात पवार यांचे जवळपास 14 हजार 300 रुपयांचे नुकसान झाले.
त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा लोखंडी फॉल जवळ (श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्द) पाचेगाव येथील अंकुश दत्तात्रय कर्डिले हा तरुण पवार कॉलेज (वडाळामहादेव) येथून येत असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून 2000 रुपये रोख व रेडमी कंपनीचा मोबाईल नेला. एकूण 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. अज्ञात चोरांनी या दोन्ही व्यक्तीला डोक्याला व पोटाला जबर मारहाण केली.
या घटनेत तीन व्यक्ती असल्याचे सांगितले जात असल्याने दोन्ही घटनेतील चोरटे एकच असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान याच काळात याच रस्त्यावर एस कॉर्नर नजिक अशीच घटना घडल्याची चर्चा होती. या घटना घडल्याने रस्त्यावरून जा-ये करणार्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोखंडी फॉलनजिक घडलेली घटना ही श्रीरामपूर पोलीस हद्दीत तर दुसरी घटना ही नेवासा पोलीस हद्दीत आहे.त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. रात्री उशीरापर्यंत दोन्ही पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.