अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मोक्का गुन्ह्यातील पसार आरोपीला त्याच्या पाच साथीदारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना वाळुंज बायपास (ता. नगर) शिवारात पकडले. त्यांच्याकडून तलवार, सुरा, लोखंडी कटावण्या, लाकडी दांडा, मिरचीपूड, मोबाईल, दोन दुचाकी असा एक लाख 60 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भरत विलास भोसले, रावसाहेब विलास भोसले, अजिनाथ विलास भोसले (तिघे रा. हातोळण, ता. आष्टी, जि. बीड), बबलु रमेश चव्हाण, कानिफ कल्याण भोसले (दोघे रा. परीते, ता. माढा, जि. सोलापुर), अभिष छगन काळे (रा. अंतापुर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार कान्ह्या उर्फ कानिफ उध्दव काळे (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड), कृष्णा विलास भोसले (रा. हातोळण, ता. आष्टी, जि. बीड), विनोद जिजाबा भोसले (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) हे पसार झाले आहेत. नगर जिल्ह्यातील मालाविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, भाग्यश्री भिटे, उमाकांत गावडे यांच्या पथक त्यासाठी काम करत होते.
भरत विलास भोसले त्याच्या आठ ते नऊ साथीदारांसह चार दुचाकीवरून वाळुंज बायपासच्या लगत अंधारामध्ये कोठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेले असल्याची माहिती सोमवारी (3 जून) गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. निरीक्षक आहेर यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिले. पथकाने नगर ते सोलापूर जाणार्या रस्त्यावर वाळुंज बायपासजवळ सापळा लावला. दबा धरून बसलेल्या सहा इसमांना ताब्यात घेतले. तिघे पळून गेले. पथकातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता ते मिळून आले नाही. अंमलदार कोतकर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत विलास भोसले हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पसार आहे. तसेच कानिफ कल्याण भोसले हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पसार आहे. पकडलेले सहा जणही सराईत गुन्हेगार आहेत. भरत भोसले विरोधात 21, रावसाहेब भोसले विरोधात 14, अजय भोसले विरोधात 21, बबलु चव्हाण विरोधात तीन, कानिफ भोसले विरोधात चार, अभिष छगन काळे विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत.