Friday, June 28, 2024
Homeक्राईमदरोडा टाकणारे 12 तासात गजाआड

दरोडा टाकणारे 12 तासात गजाआड

तोफखाना पोलिसांची कामगिरी || तिघांकडे सापडला गांजा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

व्यावसायिकाच्या दुचाकीला धडक देऊन त्यांच्याकडील रोकड लुटणार्‍या पाच दरोडेखोरांना (Robber) तोफखाना पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत गजाआड केले. दरम्यान त्यातील तिघांना चारचाकी वाहनासह पकडल्यानंतर वाहनात साडेचार किलो गांजा मिळून आला. त्या तिघांविरूध्द गांजा (Cannabis) बाळगल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार अनिल मोरे (वय 22 रा. नाव्हरा, ता. शिरूर, जि. पुणे), बादल राजु बोराडे (वय 19 रा. प्रेमदान हाडको), ओंकार इश्वर कोरेकर (वय 19 रा. नाव्हरा, कोरेकर वस्ती ता. शिरूर जि. पुणे), प्रकाश रावसाहेब उमाप (वय 22), प्रतिक सतीष सुडके (वय 23, दोघे रा. सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता) अशी गजाआड केलेल्या पाच जणांची नावे आहेत.

मंगळवारी (11 जून) रात्री अविनाश मांडगे (रा. बोल्हेगाव) हे त्यांचे बालिकाश्रम रस्त्यावरील दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला मनमाड रस्त्यावर (Nagar Manmad Highway) चारचाकी वाहने धडक दिली. त्या वाहनातून उतरलेल्या अनोळखी चार व्यक्तींनी अविनाश यांच्याकडील दोन लाख रूपयाची रोकड, दोन मोबाईल असा दोन लाख 17 हजाराचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा प्रकाश रावसाहेब उमाप व प्रतिक सतीष सुडके यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली. सुरूवातीला त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांचे साथीदार तुषार अनिल मोरे, बादल राजु बोराडे व ओंकार ईश्वर कोरेकर यांना कारसह (एमएच 46 एएल 6897) नगर – कल्याण रस्त्यावरून (Nagar Kalyan Road) ताब्यात घेतले. त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये साडेचार किलोचा गांजा (Cannabis) मिळून आला.

पोलिसांनी तो जप्त (Seized) करून घेतला असून याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अविनाश मांडगे यांना लुटल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या पाच असल्याने त्यात वाढीव दरोड्याचे कलम लावण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, उपनिरीक्षक अमोल गायधनी, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, दिनेश मोरे, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज वाबळे, संदीप धामणे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सुमीत गवळी, सतीष त्रिभुवन, सतीष भवर, मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंडू व नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या