मुंबई | Mumbai
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली. याप्रकरणी नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. परंतु, नितीन देशमुख यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेले, या संदर्भात माहिती मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांना राग अनावर झाला आणि त्यांनी आझाद मैदान पोलिसांना झापले.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत रोहित पवार पोलिसांना म्हणाले, “हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा. शहाणपण करू नका. हात खाली. सांगतोय तुम्हाला. नीट बोलता येत नसेल तर बोलायचं नाही. आमदाराला हात लावायचा नाही. हातवारे करू नका.” कार्यकर्तेही यावेळी पोलिसांवर भडकलेले दिसतायत. साहेबांना हात लावायचा नाही, असे तो मोठ्याने बोलताना ऐकू येतेय. फक्त पीआय असून आमदारांना या पद्धतीने बोलता, तुम्ही आदर ठेवायला हवा, असेही एक व्यक्ती पोलिसांना म्हणते.
नेमकं काय झालं?
आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार हे समर्थकांसह पोहोचले. यावेळी पोलिसांकडून योग्य पद्धतीने उत्तरे न दिल्याने रोहित पवार हे पीएसआयवर चिडल्याचे दिसून आले. यावेळी वरिष्ठ पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांमधील वाद थांबवला. मात्र यावेळी रोहित पवार प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. रोहित पवार पीएसआयला आवाज खाली, आवाज खाली अशा पद्धतीने बोलताना दिसून येत आहेत. बोलता येत नसेल, तर बोलायचे नाही, दमदाटी केल्यास आणखी आवाज चढवण्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान या दमदाटीचा व्हिडिओ समोर येताच रोहित पवार यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, पोलीस ठाण्यामध्ये काय सुरु आहे याची काहीच माहिती नसल्याने नितीन नितीन देशमुख कुठे आहे असे विचारणा पोलिसांकडे करत असताना पोलिस आयुक्तांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात असल्याची असल्याची माहिती सांगितली. यावेळी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो असता पोलिस आमदारांशी नीट बोलत नसतील, तर ते गरिबांशी किती नीट बोलतील? एखाद्या गरीबाला तर कानाखाली मारतील असं रोहित पवार यांनी आपल्या खुलाशामध्ये म्हटले आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“विधीमंडळ आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करुन त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यासोबत सरकारविरोधात आंदोलन केले. आरोपीला मोकाट सोडून पिडीताला अटक करणे हे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असून सत्तेतून आलेली ही मस्ती आहे, पण सरकारच्या या जुलमाविरोधात आम्ही लढत राहू!”, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




