Wednesday, April 8, 2026
HomeUncategorizedRohit Pawar : अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी...

Rohit Pawar : अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा

दिल्ली । Delhi

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकारण आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशाच्या राजधानीत पोहोचले आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. विशेषतः नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (DGCA) अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

- Advertisement -

रोहित पवार यांनी आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय सिंह यांची भेट घेऊन त्यांना या अपघातासंदर्भातील सर्व तांत्रिक आणि राजकीय बाबींची माहिती दिली. संजय सिंह यांनी संसदेत, विशेषतः राज्यसभेत या विषयावर आवाज उठवावा, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे. जे नेते संसदेत सामान्यांचा आवाज उठवतात आणि लोकहितासाठी लढतात, त्यांच्या माध्यमातून या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, असा आपला प्रयत्न असल्याचे रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी रोहित पवार यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, व्हीएसआर (VSR) कंपनीविरुद्ध अद्याप एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलेला नाही, ही मराठी माणसावर अन्याय करणारी बाब आहे. त्यांनी या प्रकरणातील राजकीय हितसंबंधांकडेही लक्ष वेधले. केंद्र सरकारमधील तेलुगू देसम पार्टीच्या (TDP) एका बड्या नेत्याचे आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकांचे जवळचे आर्थिक व वैयक्तिक संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत निष्पक्ष तपास होणे कठीण असून, संबंधित नेत्याला मंत्रिमंडळात ठेवणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तपासाच्या तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना रोहित पवार म्हणाले की, या अपघाताचा तपास ‘रुल ११’ ऐवजी ‘रुल १२’ अंतर्गत व्हायला हवा. तसेच, डीजीसीएने या प्रकरणासाठी नवीन तपास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, जेणेकरून कोणत्याही दबावाशिवाय सत्य समोर येईल. रोहित पवार यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेऊन त्यांना या प्रकरणातील गुंतागुंत समजावून सांगितली.

खासदार संजय सिंह यांनी रोहित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणातील विसंगतींवर आश्चर्य व्यक्त केले. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ हा सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह पुरावा मानला जातो, मात्र या प्रकरणात ब्लॅक बॉक्समध्येच बिघाड असल्याचे सांगितले जात आहे, ही अत्यंत संशयास्पद बाब असल्याचे सिंह यांनी म्हटले. आजवरच्या इतिहासात ब्लॅक बॉक्समध्ये अशा प्रकारची गडबड झाल्याचे कधीच ऐकले नव्हते, असे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीला पाठिंबा दर्शविला आहे.

ताज्या बातम्या

व्हिएतनामची कंपनी राज्यात साडेसहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शाश्वत नागरी विकास, औद्योगिक आणि पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात...