मुंबई | Mumbai
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार हे आक्रमकपणे या प्रकरणाची मांडणी करत आहे. ९ फेब्रुवारी नंतर त्यांनी या विषयाला धरून अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. तसेच मुंबई आणि बारामती येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवली. यानंतर आज रोहित पवार यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज ठाकरेंची भेट घेतली
आज मराठी भाषा गौरव दिन असून महाराष्ट्रात मराठी माणसाची तक्रार पोलिसांकडून दाखल केली जात नाही, ही व्यथा रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडली. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी नीट केली जात नाही. विमान कंपनीवर गुन्हा दाखल केला जात नाही. हा लढा लढण्यासाठी मनसेने पाठिंबा द्यावा, यासाठी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नेमके काय घडले? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील दोन दाखले दिले
रोहित पवार म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताविषयीची मी गोळा केलेली माहिती द्यायची असल्यामुळे राज ठाकरेंनी मला तात्काळ वेळ दिली. आज मी बराच वेळ माझ्याकडून सगळ्या घटना समजून घेतल्या. माझ्याकडील माहिती त्यांनी ऐकून घेतली. पोलिसांनी या घटनेत एफआयआर का घेतला नाही? हा प्रश्न त्यांनीही उपस्थित केला. त्यांचा कायद्याचा अभ्यास चांगला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील दोन दाखले दिले. अपघाती मृत्यू झाल्यानंतर एफआयआर घ्यावाच लागतो, हा नागरिकांचा अधिकार आहे. तसेच एफआयआर घेणे पोलिसांवर बंधनकारक आहे.
कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवत होता, कोणी ओढत होता; रोहित पवारांनी नेमकं कोणाला दम भरला?
तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे
रोहित पवार पुढे म्हणाले की, त्यांनी एकच प्रश्न केला की, महाराष्ट्रात एका व्यक्तीचा एफआयआरच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेतील हे आपल्याला येत्या काही काळात दिसेल. पण, त्यांनी सांगितले की दादांना मी ओळखत होतो आणि आम्ही जवळून काम केले आहे. जेव्हा कधी आमची भेट व्हायची तेव्हा आम्ही बोलायचो. मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू.
यासाठी ताकद आणि पाठिंबा द्यावा अशी विनंती केली
आज राज ठाकरेंना भेटत असताना योगायोगाने मराठी भाषा दिन आहे. मराठी माणसासाठी राज ठाकरे आजपर्यंत लढत आलेले आहेत. दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतः या विषयाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ताकद आणि पाठिंबा द्यावा, अशी विनंती आम्ही त्यांना केली. यावर विचारायचे कारण नाही, मी नक्कीच दादांसोबत असणार आहे. न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेन, असे राज ठाकरेंनी म्हटल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
जर थातूरमातूर अहवाल दिला तर
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते की, एक महिन्याच्या आत आम्ही अपघातासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करू. अपघाताला आज एक महिना होत आहे. आज आणि उद्या आम्ही अहवाला येतो की नाही? याची वाट पाहणार आहोत. जर थातूरमातूर अहवाल दिला तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. तसेच दोन दिवसांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन आपणही एक अहवाल प्रसिद्ध करणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.




