मुंबई | Mumbai
अजितदादा असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांचा वचक होता. आता त्यांच्या निधनानंतर आपण सुनेत्रा पवार यांना कंट्रोल करु, या भ्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काहीजण आहेत. पण सुनेत्रा काकी या एक सक्षम महिला आहेत. थोड्या दिवसांनी या नेत्यांना त्यांची ताकद काय आहे ते कळेल. कालच्या मिटिंगमध्ये स्टेजवर अव्यवस्थितपणा होता. बड्या नेत्यांचा मान राखला जात नव्हता. या अव्यवस्थितपणावरच आमदार रोहित पवार यांनी हल्ला चढवला. स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा. सुनेत्रा काकींचा आदर ठेवा, अशा शब्दात रोहित पवार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना दम भरला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोहित पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. यावेळी रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. काल एक महाशय बोलले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवीन पर्व सुरु झाले आहे. पण अजितपर्व कधी संपणार नाही. लोकांच्या मनात दादांबद्दल प्रेम कायम राहील. तसेच त्यांच्या अपघाताविषयी लोकांच्या मनात शंका आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
कुणी तरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवत होता, महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही
अजितदादांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकी आहेत. सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा. महाराष्ट्र या चार नेत्यांना पाहत आहे. दादांचा या चार नेत्यांवर वचक होता. काकींनी कुठे बसायचं याची जागा ते ठरवत होतं. कुणी तरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवत होता. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. काकींचा आदर आहे. आदर ठेवा. सांभाळून वागा आणि सांभाळून बोला, असा दमच रोहित पवार यांनी भरला.
तर ते भ्रमात आहेत, थोड्याच दिवसांनी त्यांची ताकद कळेल
मला सुनेत्रा काकींविषयी आदर आहे, त्या मोठ्या नेत्या आहेत. त्या अजितदादांसारखं काम करतील, हा विश्वास आहे. इतर नेत्यांनी त्यांच्याशी बोलताना सांभाळून वागावे आणि बोलावे. मी काल सुनेत्रा काकींचे भाषण ऐकले, त्यांनी चांगले मुद्दे मांडले. बाकीच्यांच्या भाषणात ऐकण्यासारखे काही नव्हते, पूर्वीही त्यांच्या भाषणांमध्ये काही नसायचे, त्यामध्ये महत्त्वाचे काही नसते. काल अजितदादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात काय घडले, हे माहिती नाही. पण सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत. त्या पवार कुटुंबाचा घटक आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलू शकतात, प्रश्नांना सामोऱ्या जाऊ शकतात. कोणाला वाटत असेल आपण अजितदादांना कंट्रोल करु शकत नव्हतो, पण सुनेत्रा काकींना कंट्रोल करु. तर ते भ्रमात आहेत. थोड्याच दिवसांनी त्यांची ताकद कळेल, असे रोहित पवार यांनी म्हटले.
दादा नेहमी विकासाबाबत बोलायचे महाराष्ट्र विकासात पुढे असला पाहिजे
अजित पवार यांचं अर्धवट स्वप्न पूर्ण करणार, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. अजित काका हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे होते. त्यांना आम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो. दादा नेहमी विकासाबाबत बोलायचे. महाराष्ट्र विकासात पुढे असला पाहिजे, असं दादा नेहमी म्हणायचे. त्या स्वप्नाबद्दल काकी बोलल्या की वेगळ्या स्वप्नाबद्दल बोलल्या हे माहीत नाही. पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. त्यावरच अजितदादांच्या अपघाताची चौकशी होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.




