Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रदिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता…; अजित पवारांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची पोस्ट...

दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता…; अजित पवारांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची पोस्ट व्हायरल

मुंबई | mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे ही चूक असल्याचे विधान मंगळवारी केले. यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सर्वत्र होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये रोहित पवार यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवण्यासाठी अजितादादांवर गुजरातमधील नेत्यांचा दबाव होता, असे म्हटले आहे.

- Advertisement -

रोहित पवार नेमके काय म्हणाले?
आदरणीय दादा,

खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.

दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचे मांडलिकत्व स्वीकारले आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसेच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?
राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या