मुंबई | Mumbai
नाशिकमध्ये पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा सुरु होणार आहे. त्याची जोरदार तयारी चालू आहे. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम तयार केलं जात आहे. त्यासाठी तपोवनातील १८०० वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. महापालिका प्रशासन व राज्य सरकार लोकांचा विरोध डावलून वृक्षतोडीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र, याला नाशिककर, निसर्गप्रेमी, समाजसेवी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. यासोबतच विरोधकांनी यात मोठा घोटाळा असल्याचा आणि कुंभमेळ्यानंतर ही जागा बळकावण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा ही आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केला आहे. तपोवनातील झाडं तोडून कुंभमेळा संपल्यावर ती जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव आहे.” पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सदर जागेचा नकाशा शेअर करत आरोप केले आहेत.
तपोवनाच्या जागेवर डोळा ठेवून जागा घशात घालण्याची संधी दिसत आहे
रोहित पवार म्हणाले, “नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात कुंभमेळ्यासाठी राखीव असलेल्या तपोवनच्या जागेवर डोळा ठेवून असलेल्या संधीसाधुना कुंभमेळ्याच्या निमित्ताने जागा घशात घालण्याची संधी दिसत आहे म्हणूनच जनतेचा एवढा प्रचंड विरोध असताना देखील तपोवन बाबतीत सरकारचा अट्टहास सुरु आहे.”
टेंडर फुगवून मोठा मलिदा खाल्ला जात आहे
“२२० कोटींचा MICE HUB प्रकल्प आणि साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली सदर जमीन (तपोवनची जागा) खासगी संस्थेला ३३ वर्षासाठी देऊन हजारो कोटी कमवण्याचा हा डाव आहे. त्यासोबतच कुंभमेळाच्या निमित्ताने होणाऱ्या रस्त्याच्या कामात देखील टेंडर फुगवून मोठा मलिदा खाल्ला जात आहे.”
नाशिकच्या कारभाऱ्यांचा डाव जनतेने ओळखला आहे
“श्रद्धेच्या नावाखाली नफ्याचा बाजार मांडणाऱ्या नाशिकच्या कारभाऱ्यांचा हाच डाव आता जनतेने देखील ओळखला आहे. त्यामुळे कोणाचा कितीही मानस असला तरी तपोवनची जागा लाटण्याचा डाव यशस्वी होणार नाही, हे मात्र नक्की.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




