Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : ‘घड्याळा’बाबत रोहित पवार यांचं सूचक विधान; म्हणाले, “चिन्ह राहिलं...

NCP Crisis : ‘घड्याळा’बाबत रोहित पवार यांचं सूचक विधान; म्हणाले, “चिन्ह राहिलं नाही तरी…”

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. यानंतर राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा उपस्थित झाला. या प्रकरणी निवडणूक आयोगाने बुधवारी (२६ जुलै) शरद पवार आणि आजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाला नोटीस बजावली आहे. अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे.

- Advertisement -

रोहित पवारांनी म्हटलं की, “गेल्या काही वर्षात निवडणूक आयोगाने फक्त सत्तेतील लोकांची बाजू घेतली, असं सामान्य माणसांचं मत झालं आहे. निवडणूक आयोगाने बजावलेली नोटीस ही फक्त एक प्रक्रिया आहे. यात दोन्ही बाजुचे गट ताकद लावत युक्तीवाद करतील. परंतु, निवडणूक आयोग (Election Commission) काय निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना देखील आला आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढू. जर येत्या काळात लढत असताना चिन्ह राहिलं नाही तर लोकांनाच विचारावे लागेल की, शरद पवार यांना कोणतं चिन्ह मिळायला हवं. त्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार, असा अंदाज आहे.”

दरम्यान, निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नोटीस बजावताच उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत. अजित पवार यांनी थेट प्रतिज्ञापत्रं जमा करण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे आता शरद पवार गट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा ताबा आणि चिन्ह मिळवण्यासाठी अजित पवार यांनी आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांना प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे टार्गेट दिले आहे. आमदारांनी १० हजार आणि जिल्हाध्यक्षांना ५ हजार शपथपत्र भरून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. जास्तीत जास्त शपथपत्र भरून देण्यासाठी अजित पवार गटाकडून आवाहन करण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर अजित पवार गटाकडून कागदपत्रांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या